जिल्ह्यात 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेची उत्साहात सुरुवात
पालकमंत्र्यांच्या हस्ते महादेवखोरी क्षेत्रात शुभारंभ

अमरावती, दि. 1 : राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेचा जिल्ह्यात शुभारंभ पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण होऊन आज महादेवखोरी वन क्षेत्रात झाला. मोहिमेदरम्यान जिल्ह्यात संपूर्ण जुलै महिनाभर 26 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यातील सर्व शहरे, गावे, शाळा, कार्यालये, विविध संस्था या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत.
            खासदार आनंदराव अडसूळ, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य उपवनसंरक्षक प्रवीण चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, उपवनसंरक्षक हेमंत मीना यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.     
       महादेवखोरीतील टेकडीनजिक वनक्षेत्रात आज पहाटेपासूनच विद्यार्थी, स्वयंसेवक, कार्यकर्ते, महिला संघटना, वनसंवर्धन संस्थांचे सदस्य आदी  मोठ्या उत्साहाने दाखल झाले होते. निसर्ग संरक्षण संस्था, वाईल्डलाईफ अँड एन्व्हार्यनमेंट कन्झर्वेशन सोसायटी यासारख्या अनेक संस्थांचा मोठा सहभाग होता. पालकमंत्र्यांनी वटवृक्ष लावून मोहिमेचा आरंभ केला. खासदार श्री. अडसूळ व सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. विद्यार्थी, स्वयंसेवकांनी  मोठ्या प्रमाणात बांबूंची रोपटी लावली. त्यामुळे अमरावती शहराला भूषणावह असलेल्या बांबू गार्डनच्या मालिकेत नवे बांबू उद्यान महादेवखोरी टेकडीपायथ्याशी आकारास येणार आहे.  जिल्ह्यातील मोकळ्या जागा, शासकीय, उद्योग व इतर संस्थांची कार्यालये, सार्वजनिक स्थळे, शेतीबांध, टेकड्या, नदीकाठ आदी ठिकाणी कडुनिंब, बांबू, आवळा, पिंपळ, चिंच, सीताफळ, बेहडा, साग आदींची उपवने या मोहिमेतून बहरणार आहेत.
                                                पर्यावरण संवर्धनाचा संस्कार
        मोहिमेत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीसह पालक व विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागामुळे पर्यावरण संवर्धनाचा संस्कारही जोपासला जात आहे, असे पालकमंत्री श्री. पोटे पाटील यावेळी म्हणाले.  निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. काझी यांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सामाजिक वनीकरण उपसंचालक प्रदीप मसराम, रोहयो उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे,  सामाजिक कार्यकर्ते निशिकांत काळे, जयंत वडतकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.               
                                                मोहिम नियोजन
  मोहिमेत विविध विभागांसह ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मिळविण्यात आला आहे. वन विभागाकडून 8 लाख 50 हजार, सामाजिक वनीकरणाकडून 5 लाख, ग्रामपंचायतींकडून 9 लाख 6 हजार व विविध विभागांकडून 3 लाख 44 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. 45 लाखांहून अधिक रोपे तयार आहेत. शेतीबांधांवर शेवगा, कढीपत्ता, औषधी वनस्पती आदी वृक्ष लागवड होणार आहे.  ‘नरेगा’अंतर्गत मनुष्यबळही उपलब्ध करुन घेण्यात येत आहे. ‘जिओ टॅगिंग’मुळे प्रत्येक खड्ड्याची, झाडाची नोंद व तपासणी ठेवता येणे शक्य आहे. नदीच्या दोन्ही काठांपासून एक किलोमीटर रूंदीत उपलब्ध क्षेत्रात वृक्षलागवड होणार आहे.  
00000




Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती