मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘सुयोग’ला भेट पत्रकारांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सुयोग पत्रकार सहनिवासाला भेट देऊन पत्रकारांशी   विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला.
            प्रारंभी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, विधीमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, शिबीरप्रमुख महेश पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
            यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नाणार प्रकल्प, महाकर्जमाफी, पीककर्जवाटप, समृद्धी महामार्ग, दूध आंदोलन आदी विविध विषयांवरील पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तरे दिली.
            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शेतक-यांना दुधासाठी प्रतिलीटर 3 रुपये वाढीची घोषणा यापूर्वीच केली आहे. याबाबत आवश्यक चर्चेसाठी शासन सदैव तयार आहे. दुधावर प्रक्रिया करुन पदार्थ निर्यातीचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील. पोलीसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांचे कामाचे तास आणि ताण अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कमी करण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अधिकाधिक शेतक-यांचा समावेश करण्याचा प्रयत्न आहे. पात्र असूनही केवळ तांत्रिक बाबीअभावी  वंचित शेतक-यांना लाभ मिळण्याच्या हेतूने योजना अधिक व्याप्त केली. त्यामुळे मुदतवाढ दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
            नाणार प्रकल्पाची साईट प्राथमिक अभ्यासाअंतीच निश्चित केली आहे. त्यानंतरही विविध अंगांनी अभ्यास होत आहे. त्यामुळे प्रकल्पाबाबत उपस्थित होणा-या शंकांची सखोल शास्त्रीय अभ्यासातून उत्तरे दिली जातील.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अ. भा. साहित्य महामंडळांच्या प्रतिनिधींसमवेत भेट घेऊन चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.  
            पालघर येथील पत्रकारांवर गुन्हे दाखल झाल्याच्या प्रकरणात स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
            मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीकिरण देशमुख, विशेष कार्य अधिकारी केतन पाठक, संचालक (वृत्त व जनसंपर्क) शिवाजी मानकर, संचालक (नागपूर- अमरावती) राधाकृष्ण मुळी, सुयोगचे व्यवस्थापक श्री. बारई यांच्यासह अनेक अधिकारी व पत्रकार बांधव आदी यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती