पालकमंत्र्यांकडून पर्यटन कामांचा आढावा पर्यटन विकासकामांना गती द्यावी - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील



अमरावती, दि. 27 : जिल्ह्यात पर्यटन विकासाची शक्यता लक्षात घेऊन अनेकविध कामांना शासनाने मंजूरी दिली आहे. ही कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पर्यटन व विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक अभिनाशकुमार, जिल्हा उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
            पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील संतभूमी, ऐतिहासिक स्थळे, वनसंपदा लक्षात घेऊन रिद्धपूर पर्यटन विकास, संगमेश्वर विकास, मुसळखेड येथील यशवंत महाराज संस्थान, श्रीक्षेत्र बहिरम, मालखेड निसर्ग पर्यटन केंद्र, मोर्शी येथील निसर्ग पर्यटन केंद्र, लोणी येथील संत गुलाबराव महाराज जन्म मंदिर व पालखी मार्ग, प्रल्हादपूर येथील भक्तीधाम, अमरावतीतील भीमटेकडी सौंदर्यीकरण अशा अनेक कामांना शासनाने निधी मंजूर केला आहे. काही कामे पूर्णत्वास जात आहेत. मात्र, विलंब होणा-या कामांवर विशेष लक्ष देऊन ती पूर्ण करावी. कंत्राटदाराला आदेश दिल्यावरही कामांना गती मिळत नसेल तर तत्काळ त्याचे काम रद्द करावे.
‘बांबू गार्डन’पासून उत्तम महसूल
           बांबू गार्डन हे पर्यटनाच्या क्षेत्रात अमरावतीचा लौकिक वाढविणारे ठरले आहे. वनस्पतींच्या शुष्क प्रजातींचे स्वतंत्र कॅक्टस गार्डनही उभारण्यात आले आहे. यामुळे हे केंद्र पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरून सुमारे 75 लाख रुपयांचा महसूल प्राप्त होऊ शकला. तसेच, मोर्शी येथील जैवतंत्रज्ञान पार्क  येथून सुमारे 50 लाख रुपयांचा महसूल मिळाला, अशी माहिती श्री. मीना यांनी दिली.
व्ही- सॅटमुळे ‘नरेगा’चे वेतन जलद
 चिखलदरा तालुक्यातील ग्रामपंचायतींना व्ही- सॅट उपलब्ध करुन दिल्यामुळे नेटवर्क उपलब्ध झाले आणि या गावांतील नरेगाच्या कामांवरील मजुरांना गावातच वेतन मिळू लागले. केंद्र शासनाच्या टीमनेही या कामाचा गौरव केला, अशी माहिती तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली. मेळघाटात फायबर ऑप्टिकचे काम होत आहे. त्यामुळे सगळी गावे जोडली जाणार आहेत. फायबर ऑप्टिक न पोहचू शकणा-या गावांना व्ही सॅटची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.
       मेड इन चिखलदरा या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.
000000



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती