पर्यावरण संवर्धनासाठी पाण्याचा पुनर्वापर आवश्यक
- मुख्यमंत्री फडणवीस
Ø समृद्धी महामार्गासोबतच हायस्पीड ट्रेन



Ø तीन नाविन्यपूर्ण योजनांचे ई-भूमिपूजन
Ø ब्रॉडगेज मेट्रोसाठी सामंजस्य करार

नागपूरदि. 16 :  नव संकल्पना आणि संशोधनपूर्ण प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे लोकांच्या जीवनमानात बदल होत आहे. आज पाण्याचे आर्थिक मूल्य ओळखुन त्याचा पुनर्वापर केल्यास भविष्यात पाण्यासाठी होणारा संघर्ष टाळता येईल.  पाण्याचा पुनर्वापर काटकसरीने करुन  शेती, पिण्याचे पाणी व उदयोगासाठी पाणी उपलब्ध करुन पर्यावरण संवर्धन साधता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आज कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित तीन नाविन्यपूर्ण योजनेचे ई-भूमिपूजन तसेच महामेट्रो -फीडर ट्रेन्स सामंजस्य करार स्वाक्षरी समारंभाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी, विशेष अतिथी म्हणून केंद्रीय रेल्वे, वित्त व कोळसा मंत्री पीयुष गोयल, ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री प्रा. अनिल  सोले, गिरिष व्यास, कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, डी. मल्लिकार्जुन रेड्डी, उर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विन लोहानी, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम केवळ नागपूर पुरताच नाही तर देशपातळीवरचा आहे. सांडपाणी पुनर्वापराबाबतच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमातून  नागपूरची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे. पाण्याच्या पुनर्वापराबाबत नागपूर शहर हे रोल मॉडेल  ठरले आहे. जे पाणी  अस्वच्छ आहे म्हणून आपण वाया घालवितो या पाण्याचा पुनर्वापर करुन वीज निर्मिती करण्यासोबतच उद्योगांना देखील हे पाणी देण्याचे काम नागपूरमध्ये होत आहे. पाण्याचा पुनर्वापर, या पाण्यापासून महसूल आणि प्रदूषणमुक्तीचे काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
 राज्य शासनाने महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील अस्वच्छ पाणी यापुढे  औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प व औद्योगिक वसाहतींना देण्याचे धोरण ठरविले आहे. स्वच्छ पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी  देण्यात येईल. कोळसा खाणीतील पाण्याच्या पुनर्वापर देखील उपयुक्त ठरणार आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीच्या परिसरातील दहा हजार एकर शेती सिंचनाखाली आणण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
कोळसा खाणीतून पाईप कन्व्हेयरच्या माध्यमातून कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पाला कोळशाचा पुरवठा ही अतिशय नाविन्यपूर्ण बाब आहे. त्यामुळे वाहतूक खर्चाच्या बचतीसोबतच प्रदूषणाला आळा घालण्यास सुद्धा मदत होणार आहे. कचऱ्याची  साठवणूक व कचरा डेपो हे एक प्रकारे अणुबाँबसारखे झाले आहेत. यामुळे जमीन, पाणी, नद्या, नाले  प्रदूषित होतात. त्या परिसरात दुर्गंधी  पसरते व त्याचा आरोग्यावर देखील परिणाम होतो. नागपूर महानगरपालिका यासाठी अभिनव प्रयोग राबवित आहे. भांडेवाडीजवळ कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभा राहणार आहे. येथील नागरिकांच्या निवासाच्या दृष्टीने घरकुले उभारण्यात येतील व तिथला परिसर प्रदूषणमुक्त व स्वच्छ होण्यास मदत होईल. कोळसा खाणीतून निघणारी रेती घर बांधकाम तसेच रस्ते तयार करण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, ब्रॉडगेज मेट्रोमुळे कमी पैशात अत्याधुनिक वाहतूक सुविधा लोकांना देता येईल. रेल्वेच्या रुळांचा वापर मेट्रो ट्रेन चालविण्यासाठी करण्यात येईल. ब्रॉडगेज मेट्रो नागपूर सोबतच शेजारच्या वर्धा, भंडारा जिल्ह्याला जोडण्याचे काम करणार आहे. केवळ ब्रॉडगेज रेल्वे पुरतेच मर्यादित न राहता भविष्यात या मेट्रोचे डब्बे तयार करण्याचा कारखाना नागपूरच्या परिसरात होईल.
श्री. गडकरी म्हणाले, कोळसा खाणीतून थेट औष्णिक केंद्रात कोळसा येणार असल्यामुळे प्रदूषणासोबतच वाहतूक खर्चात बचत होईल. कोळसा खाणीतील पाणी सिंचनसाठी वापरण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल. कोळसा खाणीमधून रेती उपलब्ध करुन दिल्यास कमी दरात रेती उपलब्ध होणार असल्यामुळे त्याचा उपयोग रस्ते आणि बांधकामासाठी करता येईल. सांडपाण्यातून 78 कोटी रुपये कमवणारी नागपूर ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. कोराडी व खापरखेडा विद्युत प्रकल्पाला सुद्धा नागपूर महानगरपालिका पाणी उपलब्ध करुन देणार आहे. पाणी आणि ऊर्जा यातून स्वच्छ व शुद्ध पर्यावरणाची निर्मिती होईल.
ब्रॉडगेज मेट्रोने नागपूरसह काटोल, रामटेक, सावनेर तसेच भंडारा व वर्धा जिल्ह्याला देखील जोडण्यात येणार असल्याचे सांगून श्री. गडकरी पुढे म्हणाले, यामुळे उत्तम दर्जाची वातानुकुलीत जलद वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. या वाहतूक व्यवस्थेमुळे रस्त्यावरील वाहतूकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न आहे. लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन करुन  ते म्हणाले, सेकंड टायर सिटीमध्ये ब्रॉडगेज मेट्रो सुरु झाल्यास मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होईल. त्यामुळे देशाच्या वाहतूक व्यवस्थेत बदल होण्यास मदत होईल. भूमिपूजन करण्यात आलेले तीनही प्रकल्प क्रांतिकारी असून देशाला नवी दिशा  देणारे आहेत, असे त्यांनी सांगितले.
नागपूर-मुंबई हायस्पीड ट्रेनने जोडणार – पियुष गोयल
महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम लवकरच सुरु होत आहे. त्यामुळे रस्त्याने मुंबई ते नागपूर हे अंतर कमी होणार आहे. या समृद्धी महामार्गाला लागूनच हायस्पीड ट्रेनने ही दोन शहरे जोडण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगून श्री. गोयल म्हणाले की, विदर्भातून मुंबईपर्यंत शेतातील भाजीपाला, फळे व अन्य आवश्यक कच्चा माल त्वरित मुंबईकरांना उपलब्ध होईल. पुढील चार वर्षांत देशातील सर्व  रेल्वे  पूर्णत:  विजेवर चालविण्यात येतील.
नागपूर प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.  नागपूर व विदर्भातील कोळसा खाणीतील रेती कमी दरात उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उर्जामंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, वेर्स्टन कोल फिल्डच्या कोळसा खाणीमुळे प्रभावित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात आले आहे. भांडेवाडी प्रकल्पामुळे विज तर मिळणार आहेच तसेच तेथील कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यास मदत होईल. त्यामुळे मोठया प्रमाणात येथील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. सध्या राज्यात वीज भारनियमन करण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले.  
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वेकोलीच्या पाच कोळसा खाणीतून पाईप कन्व्हेयरद्वारे औष्णिक विद्युत केंद्र कोराडी व खापरखेडा येथे कोळसा पुरवठा, वेकोलीच्या भानेगाव कोळसा खाणीतील पाण्याचा खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात वापर, भांडेवाडी येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करुन औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा व कोराडी येथे पाण्याचा पुनर्वापर, भांडेवाडी येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे ई-भूमिपूजन करण्यात आले. रेल्वे मंत्रालयाच्या महाराष्ट्रातील उल्लेखनीय कामगिरीबाबतच्या नवीन रेल्वे नवीन महाराष्ट्र पुस्तकाचे विमोचन मान्यवरांनी केली. महामेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड, महाराष्ट्र शासन आणि भारतीय रेल्वे यांच्यामध्ये महामेट्रो फीडर ट्रेन्स सामंजस्य  करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
कार्यक्रमाची रुपरेषा रेल्वेबोर्डचे अध्यक्ष अश्विन लोहानी, नागरी विकास विभागाचे प्रधान सचिव लोकांच्या जीवनात दुर्गाशंकर मिश्रा यांनी प्रास्ताविकातून मांडली.  यावेळी महानिर्मिती, वेकोली, महामेट्रो, रेल्वे, आणि महानगर पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती