साद्राबाडी येथे जिल्हा प्रशासनाकडून पाहणी सखोल संशोधनासाठी 2 पथके कार्यरत - अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची माहिती




* साद्राबाडी व परिसरात सुसज्ज यंत्रणा
* नागरिकांच्या सुविधेसाठी वॉटरप्रुफ तंबू
 नागरिकांनी  मनोधैर्य राखण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन 
अमरावती, दि.  31 : धारणी तालुक्यातील साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनांबाबत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या (जीएसआय) पथकाने ही घटना भूकंप नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला असला तरी अधिक संशोधन सुरु आहे. जीएसआय व एनसीएसच्या (नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्राफ) अहवालानंतर नेमके कारण कळू शकेल, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिली. साद्राबाडी व परिसरात सर्व विभागाच्या समन्वयाने यंत्रणा सुसज्ज असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी साद्राबाडी येथील घटनेबाबत जिल्हा प्रशासनातील अधिका-यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. परदेशी व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे आदींनी परिसराला भेट देऊन गावक-यांशी संवाद साधला.
श्री. परदेशी म्हणाले की, साद्राबाडी येथे भूगर्भातून आवाज व हालचालीच्या घटना सतत घडत असल्याने जीएसआय व एनसीएसच्या पथकाकडून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. छोट्या धक्क्यांचीही नोंद घेऊ शकेल अशी यंत्रणा एनसीएसने बसवली असून, मंगळवारी 1.2 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे.  
दरम्यान, प्रशासनातर्फे गत आठवड्यापासूनच आपत्ती व्यवस्थापन पथक व विविध विभागांची यंत्रणा साद्राबाडी येथे हजर आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वॉटरप्रुफ तंबू उभारण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीही स्वतंत्र तंबू उभारण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘एनसीएस’च्या पथकात प्रमुख बलबीरसिंह तर जीएसआयच्या पथकात वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय वानखडे, मुकेश वर्मा व भूपेश उरकुडे यांचा समावेश आहे.

                        नागरिकांना मनोधैर्य राखण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
साद्राबाडी येथे प्रशासनाकडून सुसज्ज यंत्रणा ठेवण्यात आली आहे. मी स्वत:  यंत्रणेच्या सतत संपर्कात आहे. शासन नागरिकांच्या सोबत असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये व संयम राखावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील केले आहे. साद्राबाडी परिसरातील भूकंपलहरींबाबत शास्त्रीय कारणे शोधण्यासाठी दोन पथके साद्राबाडी परिसरात कार्यरत आहेत. पालकमंत्री कार्यालयाकडून तेथील परिस्थितीबाबत सतत आढावा घेतला जात आहे.


00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती