मुख्यमंत्री वॉर रुममध्ये सात जिल्ह्यांचा आढावा जिल्ह्यांचे परिवर्तन करणारे विकास प्रकल्प मुदतीत पूर्ण करा - मुख्यमंत्री


मुंबई, दि. 23 : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये रेल्वे पूल, जलवाहिनी, नदीपात्राचे रुंदीकरण, सांडपाणी निचरा, पर्यटनाला आणि एकंदरीतच जिल्ह्याचे परिवर्तन करणारे प्रकल्प मुदतीत पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रुममध्ये जिल्हा परिवर्तनीय प्रकल्प मोहिमेचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी या मोहिमेंतर्गत निवडण्यात आलेल्या अमरावती, रायगड, सोलापूर, औरंगाबाद, चंद्रपूर, नाशिक, गडचिरोली या जिल्ह्यांतील विशेष प्रकल्पांचा आढावा व्हिडीओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आला. यावेळी संबंधित जिल्हा कार्यालयात उपस्थित असलेल्या आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत प्रकल्प राबविण्यात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. यावेळी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन उपस्थित होते.
या जिल्हा प्रकल्पांना निधी मंजूर आहे. प्रशासकीय मान्यता देखील मिळाल्या आहेत. त्यामुळे विहित कालमर्यादेत ते पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत. या प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या विकासाबरोबरच सामान्यांना देखील त्याचा लाभ होणार असल्याने विशेष लक्ष देऊन ते पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
अमरावती राजापेठ येथे रेल्वे पूल आणि भुयारी मार्गाचा कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी आमदार रवी राणा हे मंत्रालयात तर आमदार सुनील देशमुख अमरावती जिल्हा कार्यालयात उपस्थित होते. रेल्वे पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे. अमृत अभियान अंतर्गत असलेली अमरावती येथील मलनिस्सारण आणि सांडपाण्याची कामे त्वरित पूर्ण करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रायगड येथील किल्ल्यावरील सुशोभिकरणाची कामे भारतीय पुरातत्व खात्याच्या मदतीने पूर्ण करावीत. रायगड किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप आणि कनिष्ठ अभियंत्यांची पदे तातडीने उपलब्ध करुन द्यावीत. या ठिकाणच्या रोपवेच्या कामाला गती द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या प्रगतीचा, औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या समांतर जलवाहिनी योजनेचा देखील मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. चंद्रपूर येथील बाबूपेठ उड्डाणपुल, सेवाग्राम विकास आराखडा, गोदावरी नदीपात्राचे रुंदीकरण, गडचिरोलीतील स्टिल प्रकल्प, इंद्रावती नदीवरील पूल या कामांचा मुख्यमंत्र्यांनी माहिती घेत जिल्हा यंत्रणेने अन्य प्रशासकीय यंत्रणांसोबत समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश दिले.
यावेळी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा पर्यटन विकासाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले वेबपोर्टलचे सादरीकरण केले. जिल्ह्यामध्ये गड-किल्ले, दुर्ग भ्रमंती, धार्मिक पर्यटनाला मोठा वाव असून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासाबरोबरच नागरिकांना त्याची माहिती होण्याकरिता हे आगळेवेगळे पोर्टल तयार करण्यात आल्याचे नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजय कुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक आदींसह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती