साद्राबाडी परिसरातील घटना भूकंप नसल्याचा प्राथमिक अंदाज -भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संचालक मिलिंद धकाते



अमरावती, दि. २४: धारणी तालुक्यातील साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनांबाबत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या (जीएसआय) पथकाने केलेल्या पाहणीनुसार सदर घटना भूकंप नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती  विभागाचे संचालक मिलिंद धकाते यांनी आज दिली. तथापि, अधिक तपासासाठी साद्राबाडी परिसरात विभागाकडून तीन भूस्तर हालचालमापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
दरम्यान, ‘एनसीएस’ (नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्राफ)च्या तज्ज्ञांचे पथकही आज साद्राबाडीत दाखल झाले असून, त्यांच्याकडून सखोल तपासासाठी यंत्रणेच्या इन्स्टॉलेशनचे काम सुरु करण्यात आले आहे. या संस्थेचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे.
श्री. धकाते म्हणाले की, साद्राबाडी येथील घटनांबाबत नेमके कारण व शास्त्रीयदृष्ट्या तपासासाठी ‘जीएसआय’च्या पथकाने आज सकाळपासूनच परिसरात पाहणीला सुरुवात केली. प्राथमिक पाहणीनुसार सदर घटना भूकंप नसल्याचा अंदाज आहे. नागपूर व जबलपूर येथील भूगर्भ निरीक्षण केंद्रात या घटनेची नोंद झालेली नाही. या घटनेत जमीन हलून आवाज येण्याचा प्रकार घडत आहे. साधारणत: जमीनीच्या पोकळीत पाणी भरले गेले की हवा बाहेर येऊन आवाज येण्याच्या घटना घडू शकतात. साद्राबाडी येथे पावसाळ्यात साधारणत: ऑगस्टमध्येच यापूर्वीही याप्रकारचे आवाज येण्याच्या घटना घडल्या आहेत.
डेक्कन ट्रॅपची अंतर्गत रचना
श्री. धकाते म्हणाले की, भूस्तरीय रचनेनुसार हा प्रदेश डेक्कन ट्रॅपमध्ये येतो. डेक्कन ट्रॅपमध्ये जमीनीच्या अंतर्गत थरांत पोकळ्या असतात. पावसाचे पाणी शिरून त्यातील हवा बाहेर येऊन आवाज येऊ शकतो व काही हालचालही संभवते. त्याचप्रमाणे, या थरांत चुनखडीचा दगडही असतो. तो पाण्याने भिजला की त्यातील हवा बाहेर फेकली जाऊन आवाज येऊ शकतो.  त्यामुळे ही घटना भूकंप नसल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी आम्ही आणखी संशोधन करत आहोत. त्यासाठी आवश्यक बाबींचे नमुने आम्ही घेतले आहेत.
  त्याचप्रमाणे, भूगर्भातील छोट्या हालचालीचीही नोंद घेऊ शकेल, अशा तीन अतिसंवेदनशील क्षमतेच्या 3 यंत्रणा सोमवारी साद्राबाडी येथे बसविण्यात येतील जेणेकरुन अधिक ठाम निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल, असेही श्री. धकाते यांनी सांगितले.  पथकात वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय वानखडे, मुकेश वर्मा व भूपेश उरकुडे यांचा समावेश होता.


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती