मेळघाटातील राखी झाली ग्लोबल 37 देशांमध्ये पोहचणार बांबुची राखी





अमरावती, दि. 21 : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) माध्यमातून मेळघाटातील आदिवासी महिलांनी बांबूपासून बनविलेल्या पर्यावरणस्नेही राख्या सांस्कृतिक परिषदेच्या परदेशातील 37 केंद्रांमध्ये पाठविण्यात येत असल्याची माहिती आयसीसीआरचे अध्यक्ष तथा खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली.
 देशाच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीची ओळख जागतिक पातळीवर व्हावी या उद्देशाने विदेश मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आयसीसीआर संस्थेच्या माध्यमातून प्रथमच महाराष्ट्रातील आदिवासीबहुल मेळघाटातील महिलांची कला राखीच्या माध्यमातून परदेशात पोहचत आहे. विविध देशांबरोबरील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतुने कार्यरत या परिषदेचे ३७ देशांमध्ये केंद्र आहेत. या केंद्रांद्वारे त्या-त्या देशातील विद्यार्थ्यी व लोक भरनाटयम, लावणी, कुचीपुडी आदी भारतीय नृत्यप्रकार , भारतीय शास्त्रीय संगीत, संस्कृत, हिंदी आदी भारतीय भाषांचा अभ्यास करतात. या केंद्रांमध्ये भारतीय सणही साजरी केली जातात.  येत्या रविवारी भारतात रक्षाबंधानाचा सण साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मेळघाटातील आदिवासी महिलांद्वारा निर्मित राख्या आयसीसीआरच्या कैरो (इजिफ्त), मॉस्को (रशिया), जकार्ता (इंडोनेशिया) आदी जगभरातील ३७ केंद्रांमध्ये पाठविण्यात येत असल्याचे डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले.
मेळघाटाने जगाला घातलेली प्रेमाची साध
                       महाराष्ट्राच्या अमरावती जिल्हयातील मेळघाट या आदिवासी बहुल भागातील आदिवासी महिलांच्या कलेला व प्रतिभेला जागतिक स्तरावर पोहचविण्यासाठी प्रथमच आसीसीआरच्यावतीने हा उपक्रम आखण्यात आला आहे. या राख्यांच्या माध्यमातून मेळघाटातील महिलांची प्रतिभा व मेहनत परेदशातील बाजारात पोहचेल असा विश्वास डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केला. या राख्या म्हणजे मेळघाटाने जगाला घातलेली साध असल्याचेही ते म्हणाले.
 मेळघाटात संपूर्ण बांबू केंद्राच्या वतीने या भागातील आदिवासी महिलांना चरितार्थासाठी बांबूपासून विविध वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. याच केंद्राअंतर्गत मेळघाटातील धारणी तालुक्यातील लवादा गावातील वेणुशिल्पी औद्योगिक सहकारी संस्थेच्या महिलांनी बांबूपासून पर्यावरणस्नेही राख्या तयार केल्या आहेत. परदेशात पाठविण्यात येणा-या या राख्या अतिशय सुबक, रेखिव व सुंदर आहेत. विविध आकाराच्या या  राख्यांचे तेवढेच आकर्षक  बॉक्स तयार करण्यात आले असून विमानाद्वारे हे आसीसीआरच्या परदेशातील सर्वच ३७ केंद्रामध्ये पाठविण्यात येत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती