रब्बी हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर

 

रब्बी हंगाम पिकस्पर्धेत सहभागी

होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर

* शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 21 : जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पिक स्पर्धा रब्बी हंगाम 2022 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

पीकस्पर्धेमध्ये रब्बी पीके ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा एकूण पाच पीकांचा समावेश करण्यात आला आहे. पीक स्पर्धेतील पिकांची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान हजार हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र हजार हेक्टरपेक्षा कमी असल्यास स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहित मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग यासाठी सहभागी लाभार्थ्यांचे स्वत:च्या शेतावर त्या पीकाखाली भात पिकासाठी किमान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. तालुका पातळीसाठी पहिले बक्षिस रु. 5 हजार, दुसरे बक्षिस 3 हजार व तिसरे बक्षिस 2 हजार असे स्वरुप आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार, दुसरे बक्षिस 7 हजार व तिसरे बक्षिस 5 हजार असे स्वरुप आहे. व राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार, दुसरे बक्षिस 40 हजार व तिसरे बक्षिस 30 हजार असे स्वरुप आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम 300 रुपये राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 5 यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पिकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यात येईल, अशी माहिती कृषी आयुक्तालयाने कळविली आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती