मेळघाटातील 317 गावांमध्ये कौशल्य विकासासह रोजगार निर्मितीसाठी ॲक्शन प्लॅन




मेळघाटातील 317 गावांमध्ये कौशल्य विकासासह

रोजगार निर्मितीसाठी ॲक्शन प्लॅन

* 6 हजार 745 उपक्रमांचे नियोजन

 

अमरावती, दि. 16 : मेळघाटातील गावांचा विकास, रोजगार व आदिवासी बांधवांच्या सुविधांसाठी समान निधी देऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती धारणी व चिखलदऱ्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत मेळघाटातील 116 ग्रामपंचायतींमधील 317 गावांसाठी 6 हजार 745 उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यात बांधकामांसह कौशल्य विकास व रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. गावांच्या गरजा लक्षात घेऊन ॲक्शन प्लॅन अंतर्गत दोन्ही तालुक्यांसाठी 13 कोटी 70 लाखांचा तरतूद करण्यात आली आहे.

मेळघाटातील पंचायत समिती धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यांना दरवर्षी पेसा कायद्यांतर्गत निधी दिला जातो. परंतु दरवर्षी हा निधी बांधकामावरच खर्च होतो. या आर्थिक वर्षात बांधकाम, गावांचा विकास, रोजगार व आदिवासी बांधवांच्या सुविधांसाठी समान निधीचे नियोजन करुन ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. या संबंधीचा आराखडा ग्रामसभांमध्ये तयार करण्यात आला आहे. दोन्ही तालुक्यात 6 हजार 745 कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यात पायाभूत सुविधांसाठी 1 हजार 521 उपक्रम, पेसा व वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 1 हजार 711 उपक्रम, आरोग्य शिक्षण व स्वच्छतेसाठी 1 हजार 945 उपक्रम तर वन्यजीव, वन्यसंवर्धन, वन्यतळी, वनीकरण व वन्य पर्यटन यासाठी 1 हजार 613 उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

चिखलदरा तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींमधील 157 गावांमध्ये तर धारणी तालुक्यातील 62 ग्रामपंचायतींमधील 156 गावांमध्ये वरील उपक्रम राबविले जाणार आहेत. ‘आमचे गाव आमचा विकास’ या धर्तीचा पाच वर्षांसाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे.

गावांचा विकास करण्यासाठी ग्रामसभेने नाविण्यपूर्ण उपक्रमांची निवड केली आहे. यामध्ये शिक्षणातील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी कार्यशाळा व चर्चासत्र, कुपोषण कमी करण्यासाठी कार्यशाळा, कुपोषणमुक्त तालुका, गावातील आदिवासी बांधवांना रोजगार निर्मितीसाठी मस्य व्यवसाय करणे व ग्रामसभेमार्फत बाजाराची व्यवस्था उपलब्ध करुन देणे, युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणे, गावातील घनकचरा व्यवस्थापन सुयोग्यरित्या करणे, कुपोषित मुले तसेच गर्भवती महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर घेणे, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गावाला मिळालेला वनखंड, ई-क्लास जमिनीवर फळबाग तयार करणे आदी उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.

***


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती