व्याघ्र संरक्षण उद्दिष्टपूर्तीत मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशात अव्वल

 

व्याघ्र संरक्षण उद्दिष्टपूर्तीत मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशात अव्वल

अमरावती, दि. 14 : उपलब्ध मनुष्यबळाचा नियोजनपूर्वक वापर व संवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त यामुळे व्याघ्र संरक्षणाबाबतचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशात आघाडीवरील प्रकल्प ठरला आहे. 

विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या कर्मचा-यांचे सहकार्य व वाईल्डलाईफ क्राईम सेलची गतिमान अन्वेषण कार्यवाही यामुळे व्याघ्र संवर्धनासाठी अपेक्षित उद्दिष्ट्यपूर्ती शक्य होत आहे. ‘मॉनटरिंग सिस्टीम फॉर टायगर्स- इंटेसिव्ह प्रोटेक्शन अँड इकॉलॉजिकल स्टेटस’द्वारे (एमएसटीआरआयपीईएस) निर्धारित निकष पूर्ण करणा-या प्रकल्पात मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशात अव्वल ठरला आहे, असे विभागीय वनाधिकारी एम. एन. खैरनार यांनी सांगितले.

विशेष व्याघ्र संरक्षण दलाची कामगिरी

विशेष व्याघ्र संरक्षण दलात सहायक वन संरक्षक, वनक्षेत्रपाल, वनरक्षक व वननिरीक्षक यांची एकूण 112 पदे आहेत. विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या एकूण तीन तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तुकडीत वनक्षेत्रपालांच्या अखत्यारीत 27 वनरक्षक व 9 वननिरीक्षक आहेत. गुगामल वन्यजीवन विभाग, परतवाडा येथील चिखलदरा सिपना वन्यजीव विभाग व अकोट वन्यजीव विभाग यात प्रत्येकी एक याप्रमाणे तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील 6 वन्यजीव विभागात वनरक्षकांची एकूण 460 मंजूर पदे आहेत. मागील दोन वर्षात अमरावती वनवृत्तात 153 वनरक्षकांची वनपाल पदावर पदोन्नती झाल्याने मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे विशेष व्याघ्र संरक्षण दलातील वनरक्षक व वननिरीक्षक यांना नियतक्षेत्राचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. एकूण 102 वनरक्षक व वननिरीक्षकापैकी 71 जणांना संवेदनशील नियतक्षेत्राचा कार्यभार देण्यात आलेला आहे. यामुळे रिक्त पदे असली तरीही त्या क्षेत्रात वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने नियमित गस्त व दैनंदिन कामे योग्य रीतीने करणे शक्य झाले आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलाची निर्मिती ही गस्तीव्दारे व्याघ्र संवर्धन करणे या उद्देशाने करण्यात आली होती. त्यामुळे या उद्देशास कुठलाही धक्का पोहचत नाही, असे श्री. खैरनार यांनी सांगितले.

क्राईम सेलची धडाडी

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मेळघाट वाईल्डलाईफ क्राईम सेलची निर्मिती 2013 मध्ये झाली. हा सेल मेळघाट व्याघ्र प्रकल्प व महाराष्ट्राबरोबरच  इतर राज्यातील वन विभागांना देखील वेळोवेळी सायबर डेटा व गुप्त माहिती पुरविण्याचे काम अविरतपणे करीत आहे. सेलव्दारे मागील एक वर्षात 88 वन गुन्हा प्रकरणांमध्ये सुमारे 146 संशयितांना अटक करण्यात आलेली आहे.

गत सहा महिन्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पात घडलेल्या चार वन गुन्ह्यांमध्ये सेलव्दारे तातडीने आरोपींना अटक व गुन्ह्यामागील पुरावे शोधून काढण्याची मोलाची कामगिरी पार पडली आहे. या कार्यवाहीमुळे वन्यजीवांसंदर्भातील वनगुन्हेगारीवर चाप बसविणे शक्य झाले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती