पर्यटन स्थळांमध्ये पायाभूत सुविधांची कामे तत्काळ पूर्ण करणार - पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा



 

पर्यटन स्थळांमध्ये पायाभूत सुविधांची कामे तत्काळ पूर्ण करणार

- पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

* चिखलदरा महोत्सवाबरोबरच मेळघाटात होळी महोत्सवाचेही आयोजन करणार

 

अमरावती, दि. 11 : पर्यटन वाढीसाठी महत्वाच्या पर्यटन स्थळांमध्ये पायाभूत सुविधांची कामे तत्काळ पूर्ण करण्यासह चिखलदरा महोत्सवासारखे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील. त्याचप्रमाणे मेळघाटातील होलिकोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन मार्च महिन्यात दोनदिवसीय ‘होळी महोत्सवा’चे आयोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास उद्योजकता, रोजगार व महिला आणि बालविकास मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले.

मंत्री श्री. लोढा यांनी अमरावती येथे कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार विभाग तसेच पर्यटन विभागाची शनिवारी बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला. विभागाच्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यासाठी त्यांनी आज पत्रकार बांधवांशी संवाद साधला. खासदार अनिल बोंडे, अमरावती औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष किरण पातुरकर, निवेदिता चौधरी, पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई, सहायक रोजगार आयुक्त प्रफुल्ल शेळके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, नव्या संकल्पनांचा समावेश करुन चिखलदरा महोत्सवाचा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविला जाईल. हा महोत्सव अधिकाधिक उत्तम व मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी पर्यटन विभागातर्फे आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबत आवश्यक ते नियोजन करुन पुढील डिसेंबरपासून हा महोत्सव व्यापक स्वरुपात साजरा केला जाईल. त्याचप्रमाणे मेळघाटात मार्च महिन्यात होळी महोत्सवही आयोजित करण्यात येईल.

ते पुढे म्हणाले की, पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक सुविधा उभारण्याच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणेबरोबरच समितीच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध घटकांचे सहकार्य मिळविण्यात येईल जेणेकरुन क्षेत्रात आवश्यक सुविधा व नवीन संकल्पनांचा विभागाच्या योजना उपक्रमात सहभाग असेल. त्यासाठी पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक व तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करण्यात आली. लोकसहभागातून योजना उपक्रमांची परिणामकारकता वाढते हे लक्षात घेऊन पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिक, उद्योजक व तज्ज्ञ मंडळींचे सहकार्य मिळविण्यात येत आहे. समितीच्या माध्यमातून हे काम पुढे नेले जाईल.

रखडलेली कामे पूर्ण करणार

अमरावती ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज अशा संतांची भूमी आहे. श्री क्षेत्र कौंडण्यपूर, रिद्धपूर, मुक्तागिरी अशी अनेक पौराणिक, धार्मिक महत्वाची स्थळे या भूमीत आहेत. तेथे आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येईल. त्याचप्रमाणे रखडलेली कामे तीन महिन्याच्या आत पूर्णत्वास नेण्यात येतील आणि काम पूर्ण झालेल्या सुविधा नागरिकांसाठी खुल्या केल्या जातील. मेळघाटातील स्कायवॉक प्रकल्पाचे काम पूर्णत्त्वास जाण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करु. तीन महिन्यात याबाबत ठोस कार्यवाही व्हावी असा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले.

सर्व आयटीआयमध्ये ‘स्कील सेंटर’

उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी सर्व आयटीआयमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात येतील. जुन्या अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करुन अद्ययावत बाबींचा समावेश करण्यात येईल. विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरुम, व्यायामशाळा, उपाहारगृह, खेळाचे मैदान, अद्ययावत प्रयोगशाळा आदी सुविधा पुरविण्यात येतील. विद्यार्थ्यांना प्रोत्साहनासाठी स्पर्धा, मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. अमरावतीतही लवकरच भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती