Wednesday, December 14, 2022

पशुपालकांनी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करावेत - पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

 

पशुपालकांनी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करावेत

-   पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 14 : ग्रामीण भागातील पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी पशुसंवर्धन योजना राबविण्यात येतात. त्यासाठी लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पशुपालक व शेतकरी बांधवांनी दि. 11 जानेवारीपूर्वी अर्ज करून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

विभागाने जिल्हा कार्यालयांतही अद्ययावत संगणक प्रणाली लागू केली आहे. त्यानुसार एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी प्रतीक्षायादी तयार करण्यात आली आहे. ही यादी अर्ज केल्याच्या वर्षापासून पुढील 5 वर्षापर्यंत लागू असते. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हेही तपासता येणे शक्य झाल्याने लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करणे पशुपालक बांधवांना शक्य होणार आहे.

त्यानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप, शेळी-मेंढी गट वाटप, एक हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य, शंभर कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया राबविली जाणार आह. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ http.//ah.mahabms.com हे असून, मोबाईल ॲप्लिकेशन AH.MAHABMS हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.  अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 18002330418 वर किंवा पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा.

अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईलवर क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही, असे आवाहन करण्यात आले आहे. 

*****

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...