‘चला जाणूया नदीला’ अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 




‘चला जाणूया नदीला’ अभियानाच्या यशस्वितेसाठी

सर्व विभागांनी समन्वयाने काम करा

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

* अभियानात जिल्ह्यातील नेरपिंगळाई, खोलाड व चंद्रभागा नदीचा समावेश

अमरावती, दि. 19 : नदीचे स्वास्थ आणि मानवी आरोग्य यांचा निकटचा संबंध आहे. आपल्या भागातील नद्या जिवंत व प्रवाही राहाव्यात, त्यावर आधारित शेती व उद्योगव्यवसाय यांच्या बळकटीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या चला जाणूया नदीला’ या अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समितीचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड, अभियानाचे सदस्य सचिव, उपवन विभागीय अधिकारी लीना आदे, जलसंपदा अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सचिन देशमुख तसेच समितीतील अशासकीय सदस्य गजानन काळे, अरविंद नळकांडे, राजू अंबापुरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नदी संवाद अभियानात जिल्ह्यात लवकरच मृद व जलपूजनाचा कार्यक्रम चिखलदरा येथे राबविण्यात येणार आहे. ‘चला जाणूया नदीला’ ही नदी यात्रा  प्रभावी आणि लोकसहभागाची चळवळ होण्यासाठी शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे. या अभियानात समन्वयक म्हणून उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे श्रीमती कौर यावेळी म्हणाल्या.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील 75 नद्या पुर्नजीवित करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. जनसामान्यांना नदी साक्षर करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजलस्तर उंचावण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात खारपाण पट्ट्यातील अमरावती जिल्ह्यातील तीन नद्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई, चांदूररेल्वे तालुक्यातील खोलाड व अचलपूर-दर्यापूर तालुक्यातील चंद्रभागा नदीचा समावेश आहे.

गेल्या काही वर्षात पर्जन्याच्या विचलनामुळे कधी पूर तर कधी दुष्काळ अशा समस्या निर्माण होत आहे. यामुळे शेती उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. वाढते नागरिकरण आणि औद्योगिकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढत आहे. शिवाय नद्या, जलाशयांमध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता आणि साठवणूक क्षमता कमी झाली आहे. या बाबींचा विचार करता नदींना जाणून घेऊन त्या समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या अभियानाखाली नदीला संवाद यात्रेची सुरुवात दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी सेवाग्राम वर्धा येथून झाली आहे. या अंतर्गत नदी संवाद यात्रेचा आराखडा तयार करुन अंमलबजावणी करण्याबाबत श्रीमती कौर यांना संबंधितांना निर्देश दिले.  

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती