कोविड-19 निर्बंधांत शिथीलता पर्यटनस्थळे, सफारीला परवानगी अंत्यविधीला उपस्थित संख्येवरील मर्यादा काढली





कोविड-19 निर्बंधांत शिथीलता

पर्यटनस्थळे, सफारीला परवानगी

अंत्यविधीला उपस्थित संख्येवरील मर्यादा काढली

 

अमरावती, दि. 1 : कोविड प्रतिबंधासाठी लागू काही निर्बंधात राज्य शासनाच्या आदेशानुसार शिथीलता आणण्यात आली आहे. त्यानुसार पर्यटन सफारीवरील निर्बंध हटवल्याने जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सफारी आदी सुविधा पुन्हा सुरू होत आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केला आहे.

 

हे आदेश दि. 1 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात शहरी व ग्रामीण लागू आहेत.

 

दोन्ही मात्रांचे लसीकरण आवश्यक

 

आदेशानुसार, जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प, त्याअंतर्गत येणा-या चिखलदरा येथील संरक्षित क्षेत्रातील निसर्ग पर्यटन, जंगल सफारी, तसेच गाविलगड किल्ला, चिखलदरा तिकीट विक्री आदींसह सर्व प्रकारची पर्यटनस्थळे, सफारी सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. पर्यटनासाठी भेट देणा-या सर्व अभ्यागतांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.

 

स्पाबाबत

 

सर्व प्रकारचे स्पा हे त्यांच्या एकूण क्षमतेच्या 50 *टक्के* क्षमतेसह सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तथापि, यापूर्वीच्या आदेशात केशकर्तनालये, ब्युटी पार्लर्सला लागू निर्बंध स्पाला ही लागू राहतील.

 

अंत्यविधी कार्यक्रमाला उपस्थित संख्येची मर्यादा हटवली

 

त्याचप्रमाणे, अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी व्यक्ती संख्येवर मर्यादा राहणार नाही.

 

लसीकरण वाढण्यासाठी लोकसहभाग आवश्यक

 

राज्यात ज्या जिल्ह्यांचे कोविड प्रतिबंधक प्रथम मात्रेचे लसीकरण 90 टक्के व दुस-या मात्रेचे लसीकरण 70 टक्के पूर्ण झाले, त्यांना अधिक प्रमाणात शिथीलता मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी  विविध माध्यमे, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था आदी जनजागृती करून नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

पॉझिटिव्हिटी रेट घटल्यास शाळा सुरू होतील

 

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 30 टक्के असल्याने शाळा- महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यास त्याबाबत निर्णय होईल.

 

कोविडबाधितांची संख्या अद्यापही मोठी आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड अनुरूप वर्तणूकीचे पालन करावे. ज्यांचे अद्यापही लसीकरण झाले नाही किंवा दुसरी मात्रा झाली नसेल त्यांनी ते करून घ्यावे. तसेच 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनीही लसीकरण करून घ्यावे जेणेकरून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेणे प्रशासनाला सुलभ होईल. बुस्टर डोसही फ्रंटलाईन वर्कर्स, कोमॉर्बिड व ज्येष्ठांना देण्यात येत आहे. त्यानुसार संबंधितांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.   

 

000

 

 

--

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती