महिला व बालविकास मंत्र्यांकडून पर्यटन मंत्र्यांना निवेदन

 


महिला व बालविकास मंत्र्यांकडून पर्यटन मंत्र्यांना निवेदन

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळी उच्च दर्जाचे स्मारक व्हावे

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 17 :  स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले महाराज यांच्या कर्नाटक राज्यातील होदिगेरे येथील समाधीस्थळाचा जिर्णोध्दार करून उच्च दर्जाचे स्मारक निर्माण करण्याची मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांनी आज पर्यटन मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून दिले व चर्चाही केली. शहाजीराजे भोसले महाराज यांच्या समाधीस्थळी उच्च दर्जाचे बांधकाम करण्यासाठी तत्काळ कार्यवाही केली जाईल, अशी सकारात्मकता पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच हे काम सुरू होईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी केला होता जिर्णोद्धार

स्वराज्याचे संकल्पक व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताजी शहाजीराजे भोसले महाराज यांचा मृत्यू  दि २३ जानेवारी १६६४ रोजी कर्नाटक राज्यातील दावनगिरी जिल्ह्यातील होदिगेरे येथे झाला.  भारताचे पहिले कृषि मंत्री भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सन १९५६ मध्ये स्वतः होदिगेरे येथे जाऊन शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाला भेट दिली होती. समाधीची दुरवस्था पाहून भाऊसाहेबांनी त्यावेळी तत्काळ स्वच्छता समाधीस्थळाच्या आजूबाजूची झाडी साफ करून घेतली व त्यानंतर समाधीचे बांधकाम करवून घेतले होते. आता या समाधीस्थळी भव्य स्मारक होणे आवश्यक आहे. समाधीवर कोणत्याही प्रकारचे छत नाही. हे समाधीस्थळ दुरवस्थेत राहू नये यासाठी त्या ठिकाणी उच्च दर्जाचे स्मारक निर्माण करण्यात यावे, अशी मागणी मंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली आहे.

कर्नाटक शासनाशी समन्वय साधावा

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे.  त्यांचे पिताजी शहाजीराजे भोसले हे स्वराज्याचे संकल्पक व महापराक्रमी योद्धा होते. त्यांचे समाधीस्थळ हे समस्त महाराष्ट्र व भारतवर्षासाठी प्रेरणास्थळ आहे. त्यामुळे त्याठिकाणी उच्च दर्जाचे समाधीस्थळाचे बांधकाम करणे अपेक्षित आहे. समाधी परिसरामध्ये  एक एकर मोकळी जागा उपलब्ध आहे. त्यासाठी कर्नाटक सरकारसमवेत समन्वय करून महाराष्ट्र शासनामार्फत समाधीचा जिर्णोद्धार करण्यात यावा, अशी मागणी मंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली आहे.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती