पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तिवसा तालुका पाणी टंचाई सभा

 







पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तिवसा तालुका पाणी टंचाई सभा

 टंचाई निवारणाची कामे वेळेपूर्वी पूर्ण करा

 

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 24 : आगामी उन्हाळा लक्षात घेता पाणीटंचाई निवारणाच्या अनुषंगाने आवश्यक सोयी-सुविधांची पूर्तता तत्काळ करावी. एकाही गावात टंचाई उद्भवू नये असे परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे दिले.

 

  

तिवसा तालुक्यात पाणी टंचाईच्या अनुषंगाने उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तिवसा पंचायत समितीच्या सभागृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. सभापती पूजा आमले, पं. स. सभापती शिल्पा हांडे, उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार वैभव फरतारे, गट विकास अधिकारी चेतन जाधव यांच्यासह विविध गावांचे सरपंच व ग्रामसचिव यावेळी उपस्थित होते.

 

सरपंच व सचिवांशी थेट संवाद

 

या बैठकीत पालकमंत्र्यांनी तालुक्यातील विविध गावांच्या सरपंच व सचिवांकडून पाणी उपलब्धता, आवश्यक उपाययोजना याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी प्राप्त गावनिहाय मागण्यांबाबत लेखी निवेदने प्राप्त करून घेऊन तत्काळ त्यांची पूर्तता करून घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

गावांच्या आवश्यकतेनुसार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, प्रत्येक गावात तेथील आवश्यकतेनुसार हातपंप, जलवाहिनी दुरूस्ती, विहीरी, विहिर खोलीकरण आदी कामे वेळेत पूर्ण करावीत. एकाही गावात टंचाईची झळ निर्माण होता कामा नये. त्यादृष्टीने गावांच्या आवश्यकतेनुसार व मागणीनुसार सर्व आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात. महसूल, पंचायत समिती, भूजल सर्वेक्षण यंत्रणा आदी यंत्रणांनी समन्वयाने आवश्यक कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. 

 

             आखतवाड्यात दोन हातपंप, अनकवाडीत नवीन विहीर, दापोरा येथे विहीर खोलीकरण, वरखेड येथे पाच हातपंप, ठाणाठुणी येथे हातपंप व इतर सुविधा, जुन्या भारवाडीत जलजीवन मिशनमधून नदीत विहीर, दापोरी येथे विहीर खोलीकरण, विहीर अधिग्रहण, धोत्रा येथे विहीर अधिग्रहण, जलवाहिनीत आवश्यक दुरुस्ती, काटसूर येथील सौर ऊर्जाधारित यंत्रणेत दुरुस्ती, करजगाव येथे विंधनविहिर दुरुस्ती, कुऱ्हा येथे पाच हातपंप, शेंदोळा येथे स्मशानभूमीनजिक आवश्यक हातपंप त्याचप्रमाणे, पालवाडी, भांबोरा, मूर्तिजापूर, तरोडा, निंभोरा, शेंदुर्जना बाजार, शिवनगर, सुरवाडी, सारसी, टेहणी,  माळेगाव, मोझरी, देववाडी यासह विविध गावांत आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

तिवसा तालुक्यातील प्रत्येक गावांत अंगणवाड्यांची इमारत निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव द्यावेत. जिथे नेटक्या इमारती आहेत, तिथे बोलकी अंगणवाडी उपक्रम राबवावा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

 

बचत गटांना मदतीचे वाटप

 

 महिला बचत गटांचे भक्कम जाळे निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्याअंतर्गत तिवसा तालुक्याताली 313 बचत गटांना सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. त्यातील 15 गटांना आजच्या कार्यक्रमात 24 लक्ष रूपयांचे धनादेश वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यास राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजनेत प्रत्येकी 20 हजार रूपये साह्य करण्यात येते. त्याअंतर्गत धनादेशाचे वाटपही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.

 

तिवसा नगरपंचायत पदाधिकारी- अधिका-यांचा गौरव

 

स्वच्छ भारत अभियानात तिवसा नगरपंचायतीला केंद्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सर्व नगरसेवक, अधिकारी- कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.

 

43 गावांत नळजोडणी पूर्ण

 

यंदा पर्जन्यमान्य चांगले झाल्याने टंचाईची तीव्रता कमी आहे. आवश्यक कामे सुरू करण्यात येत आहेत. जलजीवन मिशनमध्ये अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. मिशनअंतर्गत 43 गावांत नळजोडणीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी दिली.

 

बैठकीला  महसूल, पंचायत समिती, नगरपंचायत आदी विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती