माविम’ म्हणजे महिलांसाठी ‘माझ्या विकासाचा महामार्ग’- ॲड. यशोमती ठाकूर.




 माविम म्हणजे महिलांसाठी ‘माझ्या विकासाचा महामार्ग- ॲड. यशोमती ठाकूर.

 

                        ‘माविम’ म्हणजे राज्यातील प्रत्येक महिलेला ‘माझ्या विकासाचा महामार्ग’ वाटायला हवा, असे कार्य आपल्याला करावे लागणार आहे, यासाठी सरकारच्या माध्यमातून आपण सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी तयार आहोत, असे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)च्या ४७व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने आज ॲड. ठाकूर बोलत होत्या.

 

                        महिलांच्या विकासासाठी महाराष्ट्र कायमच अग्रेसर राहिला असून यात महिलांच्या हाती उद्योगाची धुरा देऊन महिला आर्थिक विकास महामंडळाने महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. महिलांना केंद्रस्थानी ठेवून राज्याचं चौथं धोरण लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे माविमचा अर्थ केवळ महिला आर्थिक विकास महामंडळा पुरता मर्यादित न राहाता, ‘माविम’ म्हणजे प्रत्येक महिलेला ‘माझ्या विकासाचा महामार्ग’ वाटायला हवा, असे कार्य आपल्याला करावे लागणार आहे, यासाठी सरकारच्या माध्यमातून आपण सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी तयार आहोत, असे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)च्या ४७व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने आज ॲड. ठाकूर बोलत होत्या. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ केवळ शासनाचा उपक्रम न राहता गेल्या दोन वर्षांमध्ये एक यशस्वी चळवळ उभी राहिल्याबद्दल महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, महामंडळाच्या पदाधिकारी आणि अधिकारी- कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करीत ॲड. ठाकूर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 

महिला बचत गटांना आयकीया, ॲमेझोन, फ्लिपकर्टसोबत जोडू – मंत्री सुभाष देसाई

 

ग्रामीण भागातील कौशल्यपूर्ण कलाकारांच्या वस्तूंना बचतगटांच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी उद्योग विभाग नेहमीच प्रयत्नशील आहे. महिलांनी कुठेही थांबता आपले कौशल्य दाखवून उद्योगातून भरावी घ्यावी अशी आमची इच्छा आहे. एखाद्या हिऱ्याची पारख करावी अशा पालघरमधील एका अतिशय क्रियाशील भगिनी ज्योतीताई ठाकरे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाची सूत्रे सोपविली. त्या संधीचे सोने ज्योतीताई ठाकरे करीत असून आपण त्यांच्या माध्यमातून महिला बचत गटांना आयकीया, अमेझोन, फ्लिपकर्टसोबत जोडून महिलांसाठी नवी व्यावसायिक दालने खुली करू इच्छितो, असे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले.

 

महिलांच्या वाट्याला संघर्ष अटळ - उर्मिला मातोंडकर

 

चित्रपट क्षेत्रात अभिनेत्री म्हणून ३० वर्षांची यशस्वी कारकीर्द केल्यानंतरही राजकारण आणि समाजकारणात कार्य करताना अजूनही संघर्ष सुरूच आहे. प्रत्येक महिलेच्या वाट्याला संघर्ष येणारच आहे, त्यामुळे हार न मानता आपण यशाच्या मार्गावर चालत राहायला हवं. असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले. तसेच आज ज्या माता- पित्यांनी आपल्या मुलीला अग्रस्थानी ठेवून त्यांना पाठबळ दिलं, त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन ही अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले. यापुढेही सर्व महिलांनी एकमेकींना हात द्या, सहकार्य करा आणि यशस्वी व्हा असा मूलमंत्र देण्यासाही त्या विसरल्या नाहीत.

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)चा ४७वा वर्धापन दिन कार्यक्रम आज मुंबईतील  इंडियन मर्चंट सेंटर, येथे पार पडेला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री ॲड. यशोमती ठाकूर होत्या, तर या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुण्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, महामंडळाच्या पदाधिकारी आणि अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

 

यावेळी अपर्णा पाठक आणि ॲड. आशा शेरखाने कटके यांचे महिलांसाठी सुरक्षा कायदे विषयक मार्गदर्शन, प्रा. हरि नरके यांचे मराठी भाषेला अभिजात दर्जा  या विषयावर माहितीपर सत्र, विविध मान्यवरांचा सहभाग असलेली पॅनल चर्चा आणि तेजस्विनी कन्यांचा सत्कार, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गौरव गीताचा पुरस्कार कार्यक्रम, ‘मराठी भाषा दिनानिमित्त’ माझ्या मते मैत्री या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार असे विविध कार्यक्रम दोन सत्रात पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी केले, तर , व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी उपस्थितांचे आभार मानले. 

 

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती