‘पीडीएमसी’ रूग्णालयात हिमोडायलिसिस युनिटचे पालकमंत्र्यांचा हस्ते उद्घाटन

 






पीडीएमसीरूग्णालयात हिमोडायलिसिस युनिटचे पालकमंत्र्यांचा हस्ते उद्घाटन

गोरगरीब, गरजू रूग्णांसाठी महत्वपूर्ण सुविधा

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 28 : डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत हिमोडायलिसिस युनिट कार्यान्वित झाले आहे. गोरगरीब व गरजू रूग्णांना हे युनिट उपयुक्त ठरेल. जिल्ह्यात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

 

           डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत हिमोडायलिसिस युनिटचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.  श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, दिलीप इंगोले, युनिटप्रमुख डॉ. सुनय जी. व्यास, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. स्वप्नील मोलके, डॉ. निखिल बडनेरकर, डॉ. सौरभ लांडे, डॉ. शुभांगी वर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

 

किडनीची कार्यक्षमता अगदी कमी होणे किंवा निकामी झाल्यावर डायलिसिसची गरज भासते. रक्त शुद्धीकरणासाठी ही प्रक्रिया नियमित करावी लागते. पीडीएमसी रूग्णालयात हिमोडायलिसिस युनिटद्वारे महिन्याला अडीचशे ते तीनशे व्यक्तींवर हे उपचार केले जातात. गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ही सुविधा उपयुक्त आहे. शासनाकडून गरीब व गरजू रुग्णांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ गरजूंना मिळवून द्यावा. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेबरोबरच अल्प उत्पन्न गटासाठीच्या योजना- उपक्रम प्रभावीपणे राबवावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

यापूर्वी हे युनिट पाच खाटांचे होते. आता 10 खाटा उपलब्ध करून दिल्या असून, हेपॅटायटिस बी व हेपॅटायटिस सी या रुग्णांसाठी प्रत्येक एक खाट राखीव ठेवण्यात आली आहे, अशी माहिती युनिटप्रमुख डॉ. व्यास यांनी दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

000   

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती