आरोग्य तपासणी शिबिरात साडेपाचशे अधिकारी- कर्मचा-यांचा सहभाग जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनीही केले रक्तदान

 













आझादी का अमृत महोत्सव

नियोजनभवनात आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आरोग्य तपासणी शिबिरात साडेपाचशे अधिकारी- कर्मचा-यांचा सहभाग

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनीही केले रक्तदान

 

अमरावती, दि. 15 : धावपळीच्या आजच्या युगात आरोग्याबाबत जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुषंगाने सर्वांनी नियमित तपासणी व संतुलित जीवनशैलीचा अवलंब करावा. त्याचप्रमाणे, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, सामाजिक बांधीलकी म्हणून रक्तदानासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजनभवन येथे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी स्वत: शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.

कोविडकाळात रक्ताची गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांतर्फे वेळोवेळी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. यापुढेही सामाजिक बांधीलकी म्हणून नियमितपणे उपक्रम घ्यावा. त्याचप्रमाणे, आरोग्याप्रती जागरूकता ठेवून नियमित तपासणी, संतुलित जीवनशैलीचा अवलंब करावा. कोविड प्रतिबंधक लसीची अद्यापही दुसरी मात्रा न घेतलेल्या नागरिकांनी ती तत्काळ घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला साडेपाचशे अधिकारी व कर्मचा-यांनी प्रतिसाद दिला. शिबिरात 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरात 63 व्यक्तींची दंत तपासणी, सुमारे दोनशे जणांची रक्तदाब व शर्करा तपासणी, सुमारे 220 जणांची लिपीड प्रोफाईल तपासणी झाली. त्याचप्रमाणे, 32 व्यक्तींना कोविशिल्डची मात्रा देण्यात आली.

अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम,  जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, लिपीक व अनेक अधिकारी व कर्मचा-यांनी शिबिरात सहभाग घेतला. 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती