विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतंर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे घटकनिहाय अर्ज 28 फेब्रुवारीपर्यंत आमंत्रित

 

विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतंर्गत अनुसूचित जमातीच्या

शेतकऱ्यांचे घटकनिहाय अर्ज 28 फेब्रुवारीपर्यंत आमंत्रित

 

      अमरावती, दि.16: विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतंर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे घटकनिहाय अर्ज 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मागविण्यात येत आहेत. यामध्ये अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतात हरित गृह पॉली हाऊस उभारणी, आदिवासी जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतात शेततळ्याचे खोदकाम करून प्लास्टीक अस्तरीकरण करणे तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या दारिद्रय रेषेखालील चिखलदरा व धारणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोगरा लागवड करता यावी म्हणून अनुदान मिळेल.

हरितगृह लाभार्थी निवडीचे निकष

     ही योजना अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटाला लागू असून एकूण सदस्यापैकी किमान पन्नास टक्के महिला दारिद्रय रेषेखालील असाव्यात. शिवाय बचतगट नोंदणीकृत  असावा. आदिवासी महिला बचत गटातील महिला लाभार्थी किंवा तिच्या पतीच्या नावे किमान एक एकर जमीन, बारमाही पाणी, वीज इत्यादी सुविधा असणे आवश्यक आहे. अर्जदाराने या घटकाचा इतर योजनेमधून लाभ घेतलेला नसावा. हरितगृहाच्या उभारणीसाठी शेतात सिंचन सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच हरितगृहामध्ये फलोत्पादन पिकांची लागवड करणे बंधनकारक आहे.

मोगरा लागवड लाभार्थी निवडीचे निकष

      या योजनेचा लाभ घेण्यासाठी  अनुसूचित जमातीचे दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्याकडे स्वत:च्या मालकीची एक ते दीड एकर शेती असावी. तसेच शेतात सिंचन सुविधा असणे आवश्यक आहे.

शेततळे अस्तरीकरण लाभार्थी निवडीचे निकष

                 या योजनेचा लाभ घेण्यासाठी आदिवासी शेतकऱ्याकडे स्वत:च्या मालकीची एक ते दिड एकर शेती असावी.  तसेच यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. शेतात सिंचन सुविधा असणे आवश्यक आहे. यामध्ये महिला, अपंग, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य राहील.

            या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे जसे 7/12ची प्रत, आधार कार्डची छायाकिंत प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकची प्रथम पानाची छायाकिंत प्रत, अनुसूचित जमातीचे संवर्ग प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा सद्यस्थितीचा छायाचित्र तसेच अन्य आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

   

            योजनेचा लाभ घेण्यासाठी लक्षांकापेक्षा जादाचे अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने जेष्ठता यादी तयार करून निवड करण्यात येईल. योजनेच्या अटी, शर्ती व अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रे यासाठी आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेण्यासाठी दिनांक 28 फेब्रवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी केले आहे.

 

00000

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती