जनावरांच्या अवैध वाहतुकीवर कडक कारवाई करा जिल्हाधिकारी पवनीत कौर






 जनावरांच्या अवैध वाहतुकीवर कडक कारवाई करा

जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची आढावा बैठक

 

अमरावती, दि. 03 : राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात चालणाऱ्या जनावरांच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी शहर व ग्रामीण पोलीस यांनी योग्य समन्वय ठेवून यावर कडक कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे, जिल्हा पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय सहायक आयुक्त डॉ. राजीव खेरडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत राजे, पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने, वनपरीक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर तसेच अशासकीय सदस्यांमध्ये चंदू कडू, महेश देवळे, डॉ. सुनील सुर्यवंशी, विजय शर्मा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्रीमती कौर यांनी जनावरांच्या अवैध वाहतुकीबाबत पोलीस प्रशासनासोबत चर्चा केली. राज्याच्या सीमेलगत असलेल्या गावांमधून, परराज्यातून विशेषत: मध्यप्रदेशातून येणारी सक्षम जनावरे, गोवंश येथे विकले जातात. त्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अमरावती पोलीस आयुक्त यांनी सन 2020 मध्ये जनावरांच्या अवैध वाहतुकीबद्दल 9 गुन्हे दाखल करुन 201 जनावरांची यातून सुटका केली आहे. तर सन 2021 मध्ये जनावरांच्या अवैध वाहतुकीवर 17 गुन्हे दाखल करण्यात आली असून 360 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी सन 2020 मध्ये जनावरांच्या अवैध वाहतुकीचे 75 गुन्हे दाखल केले असून यापैकी 1054 जनावरांची सुटका केल्याची माहिती पोलीस विभागाने यावेळी दिली. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी अवैध वाहतुकीवर 6 गुन्हे दाखल केले असून त्यातील 3 प्रकरणावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. उर्वरित 3 प्रकरणांवर कार्यवाही सुरु असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत सांगण्यात आले.

जनावरांची वाहतुक करतांना पोलीस विभागामार्फत पावती बघून जनावरे सोडण्यात येतात. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार यासंबंधी परवानगी असलेली कागदपत्रे आवश्यक आहेत. आवश्यक कागदपत्रे नसल्यास प्राण्यांची वाहतुक करणाऱ्यांवर बंदी घालावी, असे श्रीमती कौर यावेळी म्हणाल्या.

जनावरांची खरेदी-विक्री करतांना त्यांना चिन्हांकित (टॅगिंग) करणे आवश्यक करावे. खेड्या-पाड्यात गायरान जागेवर अतिक्रमण झाले आहे. गोवंश सांभाळण्यासाठी गौरक्षणाला चाऱ्याची आवश्यकता असते. तरी अशा ठिकाणावरील अतिक्रमण उठवून ती जागा गौरक्षण संस्थांना चाऱ्यासाठी उपलब्ध करुन देण्याची समितीच्या सदस्यांनी यावेळी मागणी केली. अशा जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांची यादी त्वरित सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी समितीचे स्वतंत्र बँक खाते उघण्याचेही ठरविण्यात आले.

इतर खाद्यान्ने खातांना जनावरे अनावधानाने प्लास्टिकही खातात. यासाठी प्लास्टिक बंदीवर कडक कारवाई करण्यासाठी नगर प्रशासन व मनपा आयुक्त यांनी समितीच्या पुढील आढावा बैठकीला उपस्थित रहावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली. मोकाट कुत्र्यांच्या संगोपनासाठी ‘डॉग शेल्टर’ निर्माण करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

राज्यात प्राणी कल्याण बोर्डासाठी अमरावती जिल्ह्यातील शुभम सायंके आणि डॉ. राधेशाम बहादुरे या दोन अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये समाप्त होत आहे. पुढील समितीसाठी अशासकीय सदस्य पदासाठी 15 अर्ज प्राप्त झाले असून समितीच्या ठरावाने सदस्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती