कलावंतांना शासनाकडून एकरकमी अर्थसाह्य अधिकाधिक कलावंतांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन

 



कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर दिलासा पॅकेज

कलावंतांना शासनाकडून एकरकमी अर्थसाह्य

अधिकाधिक कलावंतांनी लाभ घ्यावा

-        जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन

अमरावती, दि. 14 : सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील संघटित व असंघटित कलाप्रकारांतील विविध कलावंतांना एकरकमी अर्थसाह्य देण्याचा निर्णय शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे.  त्यासाठी विहित पद्धतीने अर्ज करून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात टाळेबंदी लागू होती. टाळेबंदी शिथील केल्यानंतरही नाट्यगृहे, चित्रपटगृहे बंद होती. त्यामुळे सुमारे दीड वर्षे कलावंतांना कला सादरीकरण व त्यातून मिळणा-या उत्पन्नापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक प्रकारातील कलाकारांना शासनातर्फे एकरकमी अर्थसाह्य देण्यात येणार आहे.              

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती

पात्र कलावंतांची निवड करण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा समितीने पात्र केलेल्या कलाकारांची यादी विहित तपशीलासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे सादर केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसाह्य वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकल कलावंतासाठी निकष व अटी

 महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कलेतील केवळ कलेवर गुजराण करणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलाकार अर्ज करण्यास पात्र असतील. त्यांचे महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. कलेच्या क्षेत्रात किमान 15 वर्षे कार्यरत असावे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 48 हजारांच्या कमाल मर्यादेत असावे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणा-या लाभार्थी कलाकारांना, तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसाह्य योजनेचा लाभ घेणा-या कलाकारांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय होणार नाही.

एकल कलावंताने सादर करावयाची कागदपत्रे

कलावंताने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयातील परिशिष्ट ब-1 नुसार विहित नमुन्यातील अर्ज, महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्याचा दाखला- यात स्थानिक स्वराज्य संस्थेचा दाखलाही ग्राह्य राहील, तहसीलदारांकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असल्याचे पुरावे, आधारकार्ड, बँक खाते तपशील, शिधापत्रिका सत्यप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज येथे करा

कलावंतांनी विहित नमुन्यातील अर्ज तहसील कार्यालयातून प्राप्त करून घ्यावा, तसेच पुढील 10 दिवसांत तहसीलदार यांच्यामार्फत करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे सादर करावा.

त्याचप्रमाणे, विविध कलाप्रकारातील संस्था, समूह, फड, पथक यांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयातील परिशिष्ट ब-2 नुसार आपला अर्ज सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई येथे किंवा संचालनालयाच्या पुणे, औरंगाबाद व नागपूर येथील क्षेत्रीय कार्यालयात सादर करावा.

         एकल (वैयक्तिक) व समूह पथकासाठीच्या या योजनेचा विहित पद्धतीने अर्ज सादर करून अधिकाधिक कलावंतांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले आहे.

000  


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती