मोझरी, वलगाव, कौंडण्यपूर, शेंडगाव विकास आराखड्यातील कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

 







मोझरी, वलगाव, कौंडण्यपूर, शेंडगाव विकास आराखड्यातील कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

आराखड्याद्वारे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामांना चालना

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 28 : जिल्ह्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी श्रीक्षेत्र मोझरी, संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव, श्री क्षेत्र कौंडण्यपूर व  शेंडगाव येथे विकास आराखड्याद्वारे मोठा निधी उपलब्ध करून देऊन अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामांना चालना देण्यात आली. आराखड्यातील उर्वरित कामे व नव्याने राबवावयाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांबाबत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

 

विविध विकास आराखड्यांबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.   

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, आराखड्यातील प्रत्येक काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. दर्जेदार सुविधांची निर्मिती याद्वारे होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती देणारा चित्रपट निर्माण होणे आवश्यक आहे. या चित्रपटासह त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणा-या सचित्र माहितीचे प्रदर्शनही तिथे उपलब्ध करून द्यावे. त्यासाठीचा प्रकल्प आराखडा तयार करावा.  शिराळा येथील काम पूर्ण करण्यासाठी पर्यटन किंवा खनिज निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा. महिलाभगिनींना रोजगार मिळवून देणारे प्रशिक्षण केंद्र निर्माण करावे. 

 

संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव विकास आराखड्यात अनेक चांगली कामे उभी राहिली. त्या ठिकाणी संत गाडगेबाबा यांचा पुतळा उभारण्याचे नियोजन आहे. वलगाव एसटी स्थानक विकासाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. रेवसा, साऊर, कामुंजा येथे विकासकामांबाबत आराखडा सादर करावा. कौंडण्यपूर येथे उद्यान विकासाला चालना द्यावी. शेंडगाव विकास आराखडा, तसेच इतर सर्व विकास आराखड्यातील उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

 

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी विकास आराखडा एकूण 150 कोटी 83 लक्ष रूपयांचा आहे. आराखड्याद्वारे मोझरी, गुरुदेवनगर, वरखेड, शिराळा, यावली आदी गावांत स्मृती मंदिर, ग्राम सचिवालय, सर्वधर्म प्रार्थनास्थळ, शहिद स्मारक, प्रार्थना मंदिर, ग्राम सचिवालय, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, उद्यान विकास, पूर संरक्षक भिंत, काँक्रिट रस्ते, चौक सौंदर्यीकरण, व्हीआयपी गेस्टहाऊस आदी अनेक कामांना चालना देण्यात आली आहे व अनेक कामे पूर्णत्वास गेली आहेत. संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव विकास आराखड्यातून 37. 86 कोटी निधीतून विविध कामे राबविण्यात येत आहेत.

 

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचाही आढावा यावेळी घेण्यात आला. 35 कोटी 44 लक्ष रूपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. इमारतीचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

 

 

000000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती