पूरग्रस्त पुनर्वसित गावांतील नागरी सुविधांसाठी उर्वरित निधी लवकरच मिळणार - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


पूरग्रस्त पुनर्वसित गावांतील नागरी सुविधांसाठी उर्वरित निधी लवकरच मिळणार

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 16 : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित पूरग्रस्त पुनर्वसित मौजे देवरा, देवरी, रेवसा व पुसदा या गावांतील नागरी सुविधांसाठी आवश्यक निधीबाबत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा केली. हा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, अशी सकारात्मकता मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे या पूर पुनर्वसित गावांमधील नियोजित कामांना चालना मिळेल, असा विश्वास श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

 जिल्ह्यातील २००७ मधील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन, विविध नागरी सुविधांची कामे पूर्ण व्हावीत, यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर सातत्याने प्रयत्नशील आहेत. याबाबत त्यांनी या गावांना भेट देऊन कामांची पाहणीही केली, तसेच प्रशासनासमवेत बैठकांद्वारे आढावाही घेतला. या गावांना वेळेत निधी मिळून कामांना चालना मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पाठपुरावा केला.

त्यानुसार यापूर्वी पहिल्या टप्प्यात अमरावती जिल्ह्यातील देवरी, देवरा, पुसदा व रेवसा या पूरग्रस्त पुनर्वसित गावांसाठी निधी मिळून काही कामांना चालना मिळाली. तथापि, पुढील टप्प्यातील कामे पूर्ण होण्याची आवश्यकता लक्षात घेऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करून निवेदनही दिले. त्यानुसार लवकरच हा निधी मिळवून देण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे या गावांमधील कामे मार्गी लागणार आहेत. 

            अमरावती तालुक्यातील देवरी, रेवसा, पुसदा व देवरा या गावठाणातील पूरग्रस्त पुनर्वसित भागात रस्ते, नाली बांधकाम व विविध नागरी सुविधांसाठी 2 कोटी 80 लक्ष 65 हजार रू. निधीला प्रशासकीय मान्यता यापूर्वीच प्राप्त आहे. त्यानुसार उर्वरित निधीबाबत मागणी करण्यात आली आहे. अमरावती तालुक्यात देवरी, देवरी, पुसदा व रेवसा गावठाणातील पूरग्रस्त पुनर्वसित भागात रस्ते व नाली बांधकाम आदी कामांना चालना मिळणार आहे.

 पूरग्रस्त पुनर्वसित भागातील नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण कामे करण्याचे नियोजन आहे. अनेक कामांना गतीही मिळाली आहे. या गावांच्या विकासासाठी  निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती