पोहरा येथे शेळी समूह योजना राबविणार ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


पोहरा येथे शेळी समूह योजना राबविणार

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

          अमरावती, दि. 16 : अमरावती जिल्हातील पोहरा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र येथे ‘शेळी समूह योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळीसमूह योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ७.८१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

       राज्यातील शेळी पालन व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून फायदेशीर ठरला आहे. अल्पभुधारक, अत्यल्प भुधारक तथा भूमीहीन ग्रामीण लोकांच्या उपजीवेसाठी शेळी पालन व्यवसाय महत्त्वपूर्ण आहे. सन 2019 च्या पशू गणनेनुसार राज्यातील शेळ्यांची संख्या 106 लक्ष एवढी आहे. राज्याच्या तुलनेत अमरावती व नागपूर या दोन विभागाचे योगदान 25.06 टक्के एवढे आहे.

     शेळीसमूह योजनेसाठी 7.81 कोटी इतका निधी देण्यात येईल.  पोहरा प्रमाणेच राज्यातील उर्वरित 5 महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी समूह प्रकल्प राबविण्यासही मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शेळी पालनाचा व्यवसाय हा भूमीहीन ग्रामीण तसेच अल्पभूधारकांसाठी उपजीविकेचे महत्त्वपूर्ण साधन आहे. देशातील शेळ्यांच्या संख्येत महाराष्ट्र 6 व्या क्रमांकावर असून राज्यामध्ये उत्पादित होणाऱ्या दुधापैकी 2 टक्के हिस्सा शेळ्यांच्या दुधाचा आहे.  त्याचप्रमाणे एकूण मास उत्पादनाच्या 12.12 टक्के एवढे उत्पादन शेळीच्या मासांचे होते.

राज्यामध्ये अनेक भागात संसर्गजन्य रोगांमुळे शेळ्या रोगग्रस्त होऊन मरण पावतात. गावातील स्थानिक जातीचे बोकड किंवा उपलब्ध असणारा कोणताही बोकड पैदाशीसाठी वापरला जातो. मासांच्या वाढत्या मागणीमुळे कमी वयातील शेळ्यांची कत्तल होते व जातीवंत पशुधन उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेळी-मेंढी पालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्यामध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. राज्यातील 106 लक्ष शेळ्यांपैकी अमरावती विभागात 13.33 लक्ष तर नागपूर विभागात 13.24 लक्ष एवढी शेळ्यांची संख्या आहे. पोहरा येथे अविकसित भाग असल्यामुळे या ठिकाणी विकास कामे करण्यास मोठ्या प्रमाणावर संधी आहे. तसेच स्वयंरोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर वाव आहे. या ठिकाणापासून रस्ते, रेल्वे तसेच हवाई सुविधा जवळ आहे.

या योजनेअंतर्गत शेळी पालकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येऊन उत्पादक कंपन्याही स्थापन करण्यात येतील. शेळी पालकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात येतील.

       याशिवाय शेळ्यांचे दूध व दुग्धजन्य प्रक्रीया केंद्र स्थापन करणे, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र व निवासस्थान, सामुहिक सुविधा केंद्र स्थापन करणे आदी सुविधा निर्माण करण्यात येतील. याशिवाय शेळी समूह प्रकल्पांतर्गत शेळ्यांचे मांस प्रकिया केंद्र उभारणी, वधगृह स्थापन करणे तसेच शेळी उत्पादक कंपनी व खाजगी व्यवसायासाठी कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.

     शेळी समूह योजनेमुळे राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटीकरण प्राप्त होऊन उपजिवेकेसाठी महत्त्वपूर्ण व्यवसाय सुरु करण्याची संधी ग्रामीण भागातील नागरिकांना प्राप्त होईल, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाल्या.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती