दिव्यांग बांधवांना मदतीसाठी महाशरद पोर्टल - जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर

 

दिव्यांग बांधवांना मदतीसाठी महाशरद पोर्टल

-  जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर

 

अमरावती, दि. 15 : दिव्यांगांना सर्वतोपरी मदत व सहकार्य होण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे महाशरद पोर्टल विकसित करण्यात आले असून, दिव्यांग बांधवांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

अभियानाचा उद्देश

दिव्यांग बांधवांना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार मदत मिळवून देणे हा उद्देश आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांच्याकडून  दिव्यांगांना सर्वतोपरी मदत व सहकार्य होण्याच्या दृष्टीने या सर्व घटकांना एकाच प्लॅटफॉर्मद्वारे एकत्र आणण्यात येणार आहे. त्यासाठी दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या देणगीदारांची एकाच पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी होईल. दिव्यांग बांधव, अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छताखाली आणण्यात येणार आहे.

 त्याचप्रमाणे,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या, तसेच राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचण्यासही या माध्यमाची मदत होणार आहे. याद्वारे होणा-या विविध प्रकारच्या माहितीच्या नोंदीद्वारे दिव्यांगाची परिस्थिती आणि गरजा समजून घेण्यास व त्यानुसार उपाययोजनांना गती देण्यास मदत होईल.

            हे अभियान टप्याटप्याने राबवण्यात येणार आहे. नोंदणीसह सर्व प्रक्रिया विनामूल्य आहे. या माध्यमाद्वारे राज्यातील अनेक घटक एकत्र येऊन दिव्यांगांना मदत, सहकार्य करु शकतील. गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमांचेही सहकार्य मिळविण्यात येत आहे.

दिव्यांगांना सामाजिक संस्थांशी जोडणारा दुवा

दिव्यांग बांधव www.mahasharad.in या पोर्टलद्वारे आवश्यक बाबींसंदर्भात मागणी नोंदवू शकतात. त्यांना आवश्यक ती मदत तथा सहकार्य मिळवू शकतात. हे पोर्टल दिव्यांग व्यक्ती व समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना जोडणारा दुवा आहे. तरी दिव्यांग बांधवांनी तत्काळ नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन श्री. जाधवर यांनी केले.

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती