ग्रामीण भागात रस्तेविकासासाठी मोठा निधी; विकासाला गती मिळेल - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत 18 कोटी 23 लक्ष निधीतून जिल्ह्यात रस्ते

  ग्रामीण भागात रस्तेविकासासाठी मोठा निधी; विकासाला गती मिळेल

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 26 : जिल्ह्यात ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, अनेक कामांना चालना मिळाली आहे. ग्रामीण भागात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर 3 कोटी 9 लक्ष रूपये निधीतून शिवणगाव ते शिरजगाव मोझरी रस्ता, 2 कोटी  50 लक्ष  रुपये निधीतून नेरपिंगळाई ते आखतवाडा (प्रजिमा 103) रस्ता, एक कोटी 77 लक्ष रुपये निधीतून शिरखेड येथे रा. मा. -300 काटपूर ममदापूर ते शिरखेड रस्ता, 2 कोटी 38 लक्ष रुपये निधीतून कठोरा येथे रा. मा. -298-A कठोरा टाकळी (पिंपरी गोपालपूर) ते व्हीआर रस्ता आदी कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्याचप्रमाणे, पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने ग्रामसडक योजनेत सुकळी येथे 4 कोटी 47 लक्ष रूपये निधीतून प्र. रा. मा. -14 (चांगापूर) ते कामुंजा रा. मा. 309 (सुकळी ते वनारसी) रस्ता,  गौरखेडा येथे 3 कोटी 62 लक्ष रूपये निधीतून प्र. जि. मा. -24 (निंभोरा) गौरखेडा ते बोरखेडा व्हीआर 82 रस्त्याचे बांधकामाचाही समावेश करण्यात आला आहे.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पीआय इंडेक्सनुसार ज्या ज्या रस्त्यांसाठी निधीची गरज होती, त्याचा पाठपुरावा करून कामे मंजूर करून घेण्यात आली. जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्तेविकासाला चालना देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांचे भक्कम जाळे निर्माण होऊन दळणवळणासाठी उत्कृष्ट सुविधा निर्माण होईल व विकासाला गती मिळेल. व्यापक जनहित जोपासण्यासाठी सर्वदूर अनेकविध कामे राबविण्यात येत आहेत. भक्कम पायाभूत सुविधांद्वारे ग्रामीण भागाच्या विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

नेर पिंगळाई येथे साठवण बंधारा

मृद् व जलसंधारण योजनेत 40 लक्ष रुपये निधीतून नेरपिंगळाई येथे साठवण बंधारा बांधकामाचे व अल्पसंख्याकबहुल क्षेत्र विकास कार्यक्रमात 10 लक्ष रूपये निधीतून शेकूमियाँ दर्ग्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमीपूजनही पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. साठवण बंधा-यांमुळे जलसंवर्धन होऊन शेती व गावाला लाभ होतो. बंधा-याचे काम घेताना अधिकाधिक क्षेत्राला लाभ होण्याच्या दृष्टीने नियोजन व जागेची निवड करावी. स्थानिक बांधवांशी सविस्तर चर्चा करून कामे राबविण्यात यावी. इतरही ठिकाणी जलसंवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती