तारण वाटपात अमरावती विभाग राज्यात अग्रगण्य शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना ठरली वरदान

 

तारण वाटपात अमरावती विभाग राज्यात अग्रगण्य

शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना ठरली वरदान

 

अमरावती, दि. 13: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक हित साधणारी शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. अमरावती विभागात चालू हंगामात एकूण 2 हजार 53 शेतकऱ्यांनी शेतमाल तारणात ठेवला असून, सुमारे 26 कोटी रू. कर्जवाटप झाले आहे. अनेक वर्षापासून शेतकरी योजनेचा लाभ घेत असून, ही योजना शेतकऱ्यांसाठी  वरदान ठरत आहे.

अमरावती विभागात 22 कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतमाल तारण कर्ज योजना राबवत आहेत. सध्याची तारणाची परिस्थिती लक्षात घेतल्यास तारण वाटपात अमरावती विभाग राज्यात अग्रगण्य आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना  मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक तथा पणन संचालक सुनील पवार व सरव्यवस्थापक, दीपक शिंदे यांच्याकडून विभाग निहाय सातत्याने आढावा घेतला जातो. यापुढेही अमरावती विभागात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  आपला शेतमाल जवळच्या बाजार समितीत तारण ठेवून या योजनेचा निश्चितच मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावती विभागाचे उपसरव्यवस्थापक  मच्छिंद्र गवळे यांनी केले आहे.

      बाजारात हंगामाच्या काळात भाव पडल्यानंतर शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीच्या किंवा वखार महामंडळाच्या गोदामात समित्यांच्या माध्यमातून तारणात ठेवतात. तारणात ठेवताना बाजारभाव किंवा किमान आधारभूत किंमतीचे प्रतिक्विंटल दरानुसार शेतकऱ्यांना बाजार समितीमार्फत एकूण शेतमाल किंमतीच्या 75 टक्के तारण रक्कम अदा केली जाते. त्यानंतर शेतमालाची व कागदपत्राची पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांमार्फत  तपासणी होऊन पणन मंडळाकडून बाजार समित्यांना तारण कर्जाच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येते.

सोयाबीन, तूर, हरभरा या शेतमालाच्या काढणीनंतर हंगामात शेतकरी आपला शेतमाल नजिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणतात. मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक झाल्याने साहजिकच शेतमालाचे भाव खाली घसरतात. कधी-कधी तर शासनाने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षाही दर खाली कोसळतात. अशा वेळी आपला शेतमाल विक्रीची इच्छा नसूनही पैशाची निकड असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल कमी भावात विक्री करावा लागतो. त्यामध्ये व्यापाऱ्यांचा आर्थिक फायदा होऊन शेतकऱ्यांचे  आर्थिक नुकसान होते. ते टाळण्यासाठी शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

      साधारणत: शेतकरी आपला शेतमाल सहा महिन्यांपर्यंत बाजार समितीकडे तारणात ठेवू शकतात. त्यानंतर हंगाम कमी होऊन शेतमालाचे बाजारभाव वधारतात. अशावेळी शेतकरी आपला शेतमाल वाढीव दराने विकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. जे तारण कर्ज दिले जाते, ते अत्यल्प दराने म्हणजे वार्षिक 6 टक्के दराने वाटप होते.

चालू हंगामात अमरावती विभागात एकुण 2 हजार 53 शेतकऱ्यांनी शेतमाल तारणात ठेवलेला आहे याकरिता 87 हजार 963  क्विंटल (सोयाबीन, तूर, हरभरा) शेतमाल तारणात ठेऊन 25.94 कोटी रू. कर्ज वाटप झाले आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती