जिल्हाधिका-यांची अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी

 





जिल्हाधिका-यांची अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी

पंचनाम्यांची प्रक्रिया गतीने पूर्ण करा

-   जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 20 : अतिवृष्टीने जिल्ह्यात झालेल्या घरे, शेती नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज दिले.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी भातकुली, अमरावती व चांदूर बाजार तालुक्यात विविध गावांचा दौरा केला, त्यावेळी त्या बोलत होत्या.  जिल्हाधिका-यांनी अमरावती तालुक्यात देवरा, नांदुरा लष्करपूर व रोहणखेडा, भातकुली तालुक्यात सावरखेड, कुंड खुर्द व चांदूर बाजार तालुक्यात फुबगाव येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिका-यांनी नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्याच्या निराकरणाबाबत आदेश प्रशासनाला दिले.

घरांची व शेतीच्या नुकसानीचे त्वरित सविस्तर व तपशीलवार पंचनामे करावे. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. प्रत्येक बाबींची योग्य नोंद घ्यावी. नुकसानग्रस्तांना भरपाईसाठीचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्यात येतील. रस्त्यांचे जिथे जिथे नुकसान झाले, तिथे वेळेत दुरुस्ती करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

सावरखेड येथील वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी केली. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले. हे गाव निम्न पेढीच्या बुडित क्षेत्रात जाणार आहे. संपूर्ण गावाचे पुनवर्सन व्हावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. या मागणीनुसार तत्काळ प्रस्ताव सादर करावा. तेथील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

चांदूर बाजार तालुक्यात फुबगाव येथे घर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. जिल्हाधिका-यांनी तिथे भेट देऊन कुटुंबियांशी संवाद साधून सांत्वन केले, तसेच परिसरात आवश्यक संरक्षक भिंत तत्काळ उभारण्याचे निर्देश जि. प. बांधकाम विभागाला दिले.यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार संतोष काकडे, धीरज स्थूल, नीता लबडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

00000

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती