पावसाने वृक्षलागवड कार्यक्रमाला गती

जागतिक तापमानातील वाढ, हवामान आणि वातावरणीय बदल यांची दाहकता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे. राष्ट्रीय धोरणानुसार वनाच्छादनाचे प्रमाण 33 टक्क्यांपर्यंत वाढविणे गरजेचे आहे. केवळ वनक्षेत्रात नव्हे, तर त्याबाहेरही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व्हावी, यासाठी विविध शासकीय यंत्रणा, संस्था, संघटनांनी पुढाकार घ्यावा

- वनसंरक्षक (प्रादेशिक) जी.के.अनारसे

........

पावसाने वृक्षलागवड कार्यक्रमाला गती

अमरावती, दि. 9 : अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वनविभागाच्या वनमहोत्सव कार्यक्रमात नियोजित वृक्षलागवडीला गती मिळाली आहे.

जूनअखेर बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस होता. तथापि, अमरावती जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे बुलडाणा व अकोला वन विभागांमध्ये वृक्ष लागवड यापूर्वीच सुरु करण्यात आली असून नियोजनाच्या जवळपास 60 टक्के लागवड पूर्ण झाली आहे. अमरावती विभागामध्ये जुलैमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी  झाली असल्याने आता सर्वच ठिकाणी वृक्ष लागवड सुरु करण्यात आली आहे. तालुका निहाय वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आलेले असून एकूण 1153.71 हे. क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात येत आहे, असे प्रादेशिक वनसंरक्षक (भावसे) जी.के.अनारसे यांनी सांगितले.

 

 

नागरिकांना झाडे लावण्यासाठी सवलतीच्या दरात रोपे

वृक्ष लागवडीसाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत आहे. वृक्ष लागवड व संगोपन ही चळवळ व्हावी. खासगी मालकीचे पडिक क्षेत्र आणि शेत बांधावर, रेल्वे दुतर्फा, कालवा दुतर्फा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामूहिक पडिक क्षेत्र व गायरान क्षेत्रावर झाडे रूजावीत, यासाठी शेतकरी व वृक्षप्रेमी यांना अल्पदरात रोपे मिळण्यासाठी सवलतीच्या दरात रोपे पुरवठा करण्यात येत आहे. नुकतेच पोहरा वनखंड येथे 25 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड करुन वनमहोत्सवाचा प्रारंभ झाला. 

वनमहोत्सवात अमरावती वनविभागात 248.71 हेक्टरवर 2 लाख 76 हजार 317,  मेळघाट प्रादेशिक वनविभागात 347.50 हेक्टरवर 3 लाख 11 हजार 295, अकोला वनविभागात अडीचशे हेक्टरवर 2 लाख 32 हजार 200, तर बुलडाणा वनविभागात 390 हेक्टरवर 4 लाख 33 हजार 290 झाडे लावण्यात येत आहेत. 

कॅम्पा अंतर्गत पर्यायी वनीकरण, नैसर्गिक पुनर्निमिती, जिल्हा वार्षिक योजना आदी योजनांद्वारे स्थानिक प्रजातीच्या विविध वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. निम, सागवान, करंज, सिताफळ, बेहडा, बांबू, चिंच, पापडा, आवळा, वड, उंबर, बेल, अर्जुन, पारस, पिंपळ, शेमल, अमलतास, रिठा, जांभूळ, मोहा, आदी झाडे लावण्यात येत आहेत.

 

 

 

कुरणांच्या विकासामुळे तृणभक्षी वन्यजीवांना लाभ

कुरण विकास कार्यक्रमात गवत लागवड करण्यात येत आहे. अमरावती वनविभागात 197 हेक्टरवर 9 लाख 85 हजार रोपे, अकोला वनविभागात 110 हेक्टरवर साडेपाच लाख रोपे, तर बुलडाणा वनविभागात 305 हेक्टरवर 15 लाख 25 हजार रोपे लावण्यात येत आहेत. तृणभक्षी वन्यप्राण्यांना आवडणा-या मारवेल, तिखाडी, पवन्या आदी गवत प्रजातींची लागवड करण्यात येत आहे.

 अमरावती विभागातील 13 रोपवाटिकांकडे 8 लाख 35 हजार 382, मेळघाट (प्रादेशिक) वन विभागातील 6 रोपवाटिकांकडे 2 लाख 32 हजार 995, अकोला वन विभागातील 13 रोपवाटिकांकडे 4 लाख 28 हजार 325, तर बुलडाणा वनविभागातील 8 वाटिकांकडे 5 लाख 95 हजार रोपे उपलब्ध आहेत. याप्रमाणे अमरावती वनवृत्तातील 40 रोपवाटिकांमध्ये 20 लाख 91 हजार 912 विविध स्थानिक प्रजातींची लागवडयोग्य रोपे उपलब्ध आहेत. 

 

००० 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती