स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे आजपासून खादी उत्सव



स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे आजपासून खादी उत्सव

अमरावती, दि. ३१ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व कस्तुरबा सोलर खादी महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते १५ ऑगस्ट दरम्यान शहरातील तापडिया सिटी सेंटरमधील तिसऱ्या  मजल्यावर खादी उत्सव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते उद्या, दि. १ ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी आज दिली.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत अमरावती जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून विकेंद्रित सोलर चरखा समूह कार्यक्रम हा नाविन्यपुर्ण पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील २१ गावांमध्ये अडीचशे महिलांना सौर चरखे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 कस्तुरबा सोलर खादी महिला समितीमार्फत अमरावती जिल्हयातील शेतकऱ्यापासून कापूस खरेदी करून त्यापासून कच्चा माल तयार करतात. विविध गावातील चरख्यावर सुत कताई करून त्यापासून सौर खादी कापड व विविध सौर खादी उत्पादनाची निर्मिती केली जाते.

 संपूर्णतः महिलांनी महिलांसाठी राबविण्यात आलेला हा देशातील एकमेव प्रकल्प आहे.

 

 

या प्रकल्पामध्ये अमरावती जिल्हातील ३०० पेक्षा जास्त महिलांना कायमस्वरूपी रोजगार प्राप्त झाला असून हा प्रकल्प पूर्णतः सामाजिक भावनेतून ना नफा ना तोटा या तत्वावर राबविण्यात येत आहे. त्यामध्ये अमरावती जिल्हयातील धारणी तालुक्यातील १०० आदिवासी महिलांचा समावेश आहे. तसेच धारणी तालुक्यातील मांडू या गावी विणकाम केंद्र स्थापन केले असून तेथील १५ पेक्षा जास्त युवक- युवतीना उदरनिर्वाहाकरिता कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचा संस्थेचा उद्देश आहे.

या प्रकल्पाअंतर्गत राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रमा अंतर्गत (MSICDP) अमरावती एम आय डी सी येथे ग्रीनफॅब सोलर खादी प्रोसेसिंग क्लस्टर या नावाने सामुहिक सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या सामुहिक सुविधा केंद्रामध्ये ८० टक्के शासनाचा सहभाग आहे.

अमरावतीकरांनी या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन खादी ग्रामोद्योग कार्यालय व कस्तुरबा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती