विविध शहरांतील कामांचा आढावा
साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक
उपाययोजना करावी
- जिल्हाधिकारी पवनीत कौर
अमरावती, दि. 22 : पावसाळ्यात उद्भवणारे साथरोग नियंत्रणासाठी स्वच्छता,
आरोग्य सुविधा, जनजागृती आदींबाबत कार्यवाही करतानाच, सर्वत्र स्वच्छ पाणीपुरवठा होईल
याची दक्षता घ्यावी. साथरोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे
राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.
विविध कामांचा आढावा घेण्याबाबत जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषदा,
नगरपंचायतींच्या मुख्याधिका-यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या
बोलत होत्या. नप प्रशासन अधिकारी गीता वंजारी यावेळी उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, नियोजित कामांच्या प्रशासकीय
मान्यता प्राप्त करून घेण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी. पावसाळ्यात उद्भवणारे
साथरोग लक्षात घेता सार्वजनिक स्वच्छता चांगली ठेवण्यासह वैयक्तिक आरोग्य दक्षता सूचनांबाबतही
प्रभावी जनजागृती करावी. रुग्णालये सुसज्ज असावीत. तालुका आरोग्य अधिका-यांशी समन्वय
ठेवावा. पाणीपुरवठ्यात वीज खंडित होणे आदी व्यत्यय येत असल्यास वेळीच टँकर आदी पर्यायी
व्यवस्था व्हावी. नागरिकांना सर्वत्र स्वच्छ पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. अतिक्रमणे
नियमानुकुल करण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
‘माझी वसुंधरा अभियाना’त जिल्ह्याला
पुरस्कार
‘माझी वसुंधरा अभियाना’च्या अंमलबजावणीत अमरावती हा विभागातील सर्वोत्कृष्ट
जिल्हा ठरला. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नगरपालिकांनी केलेल्या
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्याला पुरस्कार मिळाला. याबद्दल सर्व मुख्याधिका-यांच्या
वतीने जिल्हाधिका-यांचे अभिनंदन करण्यात आले. शेंदुरजना घाटचे मुख्याधिकारी रवी पाटील
व नांदगाव खंडेश्वरचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना जिल्हाधिका-यांच्या हस्ते
गौरविण्यात आले. या दोन्ही नगरपालिकांना विकासकामांसाठी 1 कोटी रू. निधी मिळणार आहे.
'हर घर तिरंगा' उपक्रम दि. 13 ते 15 ऑगस्ट या
काळात राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम सर्व शहरे व नगरांमध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी
व अधिकाधिक लोकसहभाग मिळविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी
यावेळी दिले.
000

.jpeg)

No comments:
Post a Comment