अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

*अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणार- पालकमंत्री

       अमरावती, दि.19 (जिमाका): जिल्हा सामान्य रुग्णालयातील बहुप्रतिक्षीत सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण आज पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सामान्य रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना या सीटी स्कॅन मशीनच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. रुग्णांच्या आरोग्याशी संबंधीत या मशीनच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीतुन 2 कोटी 42 लक्ष रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी उपलब्ध करुन दिला.
यावेळी व्यासपीठावर महापौर चरणजीत कौर नंदा, आमदार सर्वश्री डॉ. अनिल बोंडे, डॉ. सुनील देशमुख, ॲड. श्रीमती यशोमती ठाकुर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, सुपर स्पेशालीटीचे अधीक्षक डॉ. श्यामसुंदर सोनी व आरोग्य यंत्रणेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. अरुण राऊत यांनी केले. त्यांनी 2011 पासून मशीन बंद असल्यामुळे रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यास अडचणे येत होती मात्र आता आज लोकार्पण झालेली ही मशीन उद्यापासुन कार्यरत होणार असून रुग्णांसाठी सक्षम सुविधा सामान्य रुग्णालयातर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांनी रुग्णालयातर्फे पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा धावता आढावा घेतला. पालकमंत्र्यांनी बर्न वाडर् मध्ये 20 एअर कंडीशनर उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. सीटी स्कॅन मशीन साठी रेडियोलॉजीस्ट म्हणुन काम करणारे डॉक्टर अजय कडुकर, डॉ. काळे, डॉ. कपाळे आदींचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
सीटी स्कॅन मशीन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय हा सर्व आमदारांच्या सहभागाने डीपीसी निधीमधुन सर्व सहमतीने असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले कि, लोकसहभागातून आरोग्य सेवेचा कायापालट करता येऊ शकतो. सामान्य रुग्णालयातील प्रत्येक वार्ड हा सुसज्य व चांगला असला पाहिजे. तीन महिन्यात सामान्य रुग्णालयासाठी 20 एलसीडी टीवी, 10 वॉटर कुलर व 20 एअर कंडीशनर आपण लोकसहभागातून उपलब्ध करुन दिल्याचे डायलीसीस व अन्य महत्वाच्या मशीन लवकर उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाला पुढील उपचारासाठी मुंबई, नागपुरला न जाता शहरातच सामान्य रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. इर्विन, डफरीन रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काम समाधानकारक असल्याचे उदगार त्यांनी काढले. लवकरच अमरावतीत सार्वजनिक खाजगी भागीदारीतून (पीपीपी) वैद्यकीय महाविद्यालय आणणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. यावेळी सर्व आमदारांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला रुग्णांचे नातेवाईक, नर्सेस व इतर गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सीटी स्कॅन मशीन उपलब्ध करुन दिल्याबद्दल मैत्री संघठनेतर्फे पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन उमेश आगरकर व आभार अजय साखरे यांनी मानले.

* सीटी स्कॅन मशीनची वैशिष्ट्ये
* जापान मेड तोशिबा टेक्नॉलॉजी ची कंपनी
* एकावेळी 10 रुग्णांची तपासणी करणार
* मॉडेल एलेक्झीयन व्ही 6
* रेडियोलॉजीस्ट डॉ. अजय कडूकर व टेक्नीशियन शैलेश काळे हे मशीनचे कामकाज सांभाळतील.

                                                                        00000





Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती