गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर लॅब प्रकल्प उपयुक्त
पालकमंत्री प्रविण पोटे
          अमरावती, दि.15 (जिमाका) : जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर लॅब प्रकल्प उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी केले. येथील पोलिस अधिक्षक ग्रामीण कार्यालयात अत्याधुनिक अशा प्रकारची सायबर लॅब सुरु करण्यात आली असुन त्याचे उद्घाटन व मोबाईल फॉरेन्सीक वाहन लोकार्पण सोहळा ना.पोटे यांच्याहस्ते झाला यावेळी ते बोलत होते.
          आ.डॉ.सुनिल देशमुख, विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलिस अधिक्षक लखमी गौतम, फॉरेन्सीक लॅबचे उपसंचालक डॉ.विजय ठाकरे, पोलिस उप अधिक्षक महानवर, कदम आदी उपस्थित होते.
          पोटे म्हणाले की, मा.मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून गृह विभाग, विशेष पोलिस महानिरीक्षक व महिला अत्याचार प्रतिबंध सेल यांच्या मार्फत प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सायबर लॅबची स्थापना करण्यात आली आहे. सायबर क्राईम गुन्ह्याचे वाढते प्रमाण लक्षात घेवून तपास जलद गतीने होण्यासाठी लागणाऱ्या तपासाकरीता लागणारी माहिती लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी सायबर लॅबची स्थापना करण्यात आली आहे.
          विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव म्हणाले की, या सायबर लॅबमध्ये ब्लड डिटेक्शन, फिमेल डिटेक्शन, क्राईम सिन इन्स्टुमेंटशन, नार्कोटिक्स, स्फोटके, बुलेट होल टेस्टींग, गन शॉट, फॉरेन्सीक लाईट, मॅगनिफायर सेट, जनरल फोटोग्राफी आदी तपासणीच्या सुविधा या लॅबमध्ये राहणार आहे. याशिवाय अत्याधुनिक फिरते फॉरेन्सीक वाहनाचा लोकार्पण सोहळा यावेळी झाला.
          पोलिस व फॉरेन्सीक या कामामध्ये अत्याधुनिकता आणणारे पहिले पाऊल देशात महाराष्ट्राने सुरु केले आहे. चालु काळामध्ये प्रत्येक गुन्ह्यामध्ये गुन्हेगारीस शिक्षेपर्यंत पोहचविण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सीक लॅब यांच्याकडे भौतिक, जैविक, रासायनिक नमुने, त्याचे जतन व विश्लेषण, वैज्ञानिक पद्धतीने होणे यावर अवलंबुन असते. फॉरेन्सीक हा फार मोठा विषय असुन प्रत्येकाला अवगत होणे कठिण आहे म्हणून नमुन गोळा करतांना घ्यावयाची काळजी व उपाय यावर बरेच मार्गदर्शन झाले.
          या फॉरेन्सीक लॅबमध्ये अत्याधुनिक सुविधाचित देण्यात आले आहे. यात स्कॉटलँड यार्ड, युएफए सारख्या अत्याधुनिक किट, एक वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, एक प्रयोगशाळा परिचर राहणार आहे. या सर्वाचे नैतृत्व वैज्ञानिक अधिकारी करतील व हे संबंधित पोलिस अधिक्षक कार्यालयास सलग्न होतील. 
          न्यायालयामध्ये भक्कमपणे पुरावे सादर करता यावेत म्हणून पोलिस अधिक्षक व पोलिस आयुक्त कार्यालयात फॉरेन्सीक वाहन देण्याचे ठरविले आहे. या वाहनाचे डिझाईन फॉरेन्सीक लॅबच्या तज्ज्ञांनी तयार केले आहे. राज्यात अशी 47 वाहने असुन पहिल्या टप्प्यात मा.मुख्यमंत्री महोदयांच्याहस्ते पुणे येथून पाठविण्यात आले. त्यातील पहिल्या 10 मधील वाहन अमरावती ग्रामीणला मिळाली.
          या वाहनामध्ये साधारणत: 13 विविध प्रकारच्या किट असुन खुन, बलात्कार, डिएनए, फिंगर प्रिंट, स्फोट, गोळीबार, अंमली पदार्थ अशा प्रकारातील गुन्ह्यामध्ये नमुने, ॲडव्हांस सायंटिफिक मेथड या माध्यमातून करण्याकरीता याचा उपयोग होईल. यात आधुनिक टॉर्च असुन त्यामुळे खुन, बलात्कार या सारख्या गुन्ह्यामध्ये नमुने गोळा करण्याकरीता विशेष मदत होणार आहे. वाहनामध्ये कोल्ड स्टोरेजची विशेष व्यवस्था आहे. गुन्हे अन्वेषणासाठी विशेष गती मिळणार आहे. हे अत्याधुनिक वाहन व सुविधा लोकार्पण शासनाच्यावतीने आज झाले आहे.
          प्रारंभी पोलिस आयुक्त मंडलिक यांनी मंत्री महोदयांचे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्र्यांनी सायबर लॅबची व फॉरेन्सीक वाहनाची पाहणी केली.
00000

काचावार/गावंडे/सागर/हरदुले/15-08-2016/ 12-56 वाजता











Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती