जलयुक्त शिवार अभियानातील अपुर्ण कामे पूर्ण करण्यासाठी
डिसेंबर पर्यत मुदतवाढ
*विभागात 143327 टीसीएम जलसाठा निर्माण
जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे

       अमरावती, दि.19 (जिमाका): जलयुक्त शिवार हा महाराष्ट्‌र शासनाचा अत्यंत महत्वकांक्षी कार्यक्रम असुन या अभियानांतर्गत सन 15-16 या वर्षापासुन पुढील पांच वर्षे दर वर्षी 5 हजार याप्रमाणे 25 हजार गावें टंचाईमुक्त करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यात सन 15-16 मध्ये 6202 गावांची तर 16-17 मध्ये 5281 गावांची निवड करण्यात आली आहे. अमरावती विभागात 1369 गावें 15-16 मध्ये निवडण्यात आली आहे. या गावातील अपुर्ण असलेली कामे तातडीने पुर्ण करता यावी म्हणुन डिसेंबर 2016 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सन 2016-17 या वर्षातील निवडण्यात आलेल्या गावातील कामे मार्च 2017 पर्यत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिलेत.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील जलसंधारण विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री प्रवीण पोटे, जिप. अध्यक्ष सतीश उईके, आमदार सर्वश्री डॉ. सुनील देशमुख, डॉ. अनिल बोंडे, रमेश बुंदीले, विरेंद्र जगताप, यशोमती ठाकुर, राजेंद्र पाटणी, आकाश फुंडकर, डॉ. शशीकांत खेडेकर, संजय रायबोलकर, रणधीर सावरकर, अमीत झनक, प्रकाश भारसाकळे, जलसंधारण विभागाचे सचिव पुरुषोत्तम भापकर, प्रभारी विभागीय आयुक्त किरण गित्ते, विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषि विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ना. शिंदे म्हणाले, अमरावती विभागात सन 15-16 या वर्षात निवडलेल्या 1396 गावांमध्ये 33255 कामे पूर्ण झाली आहे. 3560 कामे प्रगतीपथावर आहेत. सन 16-17 मध्ये निवडलेल्या 998 गावांपैकी 329 गावात 864 कामे पुर्ण झाले असुन 399 कामे प्रगतीपथावर आहेत. या कामावर मागील वर्षी 674 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या वर्षातही आतापर्यत 22 कोटी निधी खर्च झाला आहे. या सर्व कामामुळे विभागात 149326 टीसीएम एवढा जलसाठा क्षमता निर्माण झाली असुन 2 दोन संरक्षित सिंचन दिल्यास सुमारे 85249 लक्ष हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे.
जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी जलसंधारण, कृषि व जलसंपदा विभागातील रिक्त पदे प्रधान्याने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील खारपान पट्ट्यात जलयुक्त अभियानांतर्गत विशेष योजना राबविण्याचे ठरविले आहे. कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्याची जुनी, नवी कामे तातडीने पुर्ण करण्यासाठी विशेष अनुदान उपलब्ध करुन देऊ, या बंधाऱ्यातील वाया जाणारे पाणी अडविण्यासाठी 15 ऑक्टोंबर पर्यत कार्यवाही करावी, पाणी वाटप संस्था करीता ज्यांनी-ज्यांनी प्रस्ताव सादर केले आहे. त्यास मंजुरी द्यावी, असे ते म्हणाले.
टंचाईची परिस्थितीवर तातडीने मात करण्यासाठी स्थानीक गरजा लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी, संरक्षित सिंचन या सर्वांना पुरेल एवढे वॉटर बजट तयार करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.
 प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करुन प्रभारी विभागीय आयुक्त किरण गित्ते यांनी विभागातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कामाची माहिती दिली. ते म्हणाले लोक सहभागातुन मागील वर्षी 651 गावात 2618 कामे सुरु आहेत. याद्वारे 10792252 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. लोकसहभागाची कींमत 102 कोटी रुपये आहे. यावर्षी 13 गावात 58 लोक सहभागाची कामे सुरु आहेत. 225300 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
यावेळी कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या यशस्वी अमलबजावणी साठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

                                                                        00000




Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती