महाराजस्व अभियानांतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना
पालकमंत्री पोटे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
       अमरावती, दि.6: महाराजस्व अभियान, विस्तारीत समाधान योजनेंतर्गत महिला सबलीकरण सप्ताहानिमित्त चांदुर रेल्वे येथील यादव मंगल कार्यालयात आयोजित महाशिबिरात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचे धनादेश वितरित करण्यात आले.
          या समारंभास आमदार विरेंद्र जगताप, नगराध्यक्ष अभिजीत सराट, पंचायत समिती सभापती किशोर झाडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय मुळे, तहसीलदार राजगडकर, वाहुरवार आदि उपस्थित होते.
ना. पोटे म्हणाले कि महाराजस्व अभियान, समाधान शिबीरामधुन अनेकांची प्रलंबित प्रकरणे निकाली निघाली आहे. एकाच छताखाली येऊन गरजूंना त्यांच्या दारात जाऊन न्याय देता येतो. शेवटच्या माणसांपर्यत जाऊन त्यांच्या पर्यत शासनाच्या योजना पोहचविण्यात येत आहेत. अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेले प्रश्न या निमित्ताने सोडविण्यात येत आहेत. असे सांगुन ना. पोटे म्हणाले, हे पारदर्शक शासन आहे. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिळुन लोकसहभागातुन जलयुक्त  शिवार योजना यशस्वी पणे राबविल्यामुळे सर्वत्र जलसाठे दिसत आहेत. सर्वसामान्यांना सोईचे व्हावे म्हणुन पांदण रस्त्याची योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. याचे फायदे ही लोकांना मिळत आहे. ज्या-ज्या ठिकाणी पांदण रस्त्यावरील अतिक्रमणे झाले असतील ते त्वरीत काढण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. एमआरईजीएस अंतर्गत पांदण रस्त्यावर मुरुम किंवा लहान लहान पुल बांधण्याबाबत आपण प्रयत्न करु असे ते म्हणाले.
सबलीकरण सप्ताहानिमित्त विविध स्टॉल ला भेट
राज्यात 1 ते 7 ऑगस्ट पर्यत महिला सबलीकरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने महिलांसाठी असणाऱ्या विविध योजनांवर आधारित विविध विभागाने यादव मंगल कार्यालयात स्टॉल उभारले होते. त्याची पाहणी पालकमंत्री पोटे यांच्या सह सर्व उपस्थितांनी केली. यामध्ये महिला बचत गटाचे स्टॉल, कृषि विभागाच्या विविध योजना, वन विभाग, स्टेट बॅक ऑफ इंडिया आदि स्टॉल ला भेट दिली.
महाराष्ट्र समृद्धी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांशी संवाद
आपल्या भागातील शेतमाल आठ ते दहा तासात पाठविता यावा म्हणुन नागपुर ते मुंबई एक्सप्रेस हाईवे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विदर्भातील तीन जिल्ह्यातुन सुमारे 70 किमी चा मार्ग जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 800 शेतकऱ्यांच्या 800 हेक्टर जमीन भुसंपादन लागणार आहे. या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमीनी जातील, त्यांना नांदगाव पेठ व नांदगाव खंडेश्वर येथील एमआईडीसी मध्ये 25 जमीन परत मिळणार आहे. या संदर्भातील माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे आणि जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगुन त्यांच्याशी संवाद साधला.
धनादेशाचे वाटप
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत 12 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजाराच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. याशिवाय 5 बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपये फिरता निधी कर्ज वाटप, वन्य प्राण्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले आहे. अशा 8 शेतकऱ्यांना 83 हजार 387 रुपये, चांदुर रेल्वे वन परिक्षेत्रातील वन व्यवस्थापन समिती कारला च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप, विशेष घटक योजनेंतर्गत अनुसुचित जमातीच्या तीन शेतकऱ्यांना ताडपत्री वाटप, परितक्त्या व निराधार तीन महिलांना लाभार्थ्यांना पिवळ्या शिधापत्रीकांचे वाटप, 7/12 वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी म्हणाले कि, महिलांच्या योजनांची माहिती त्यांच्या पर्यत पोहचविण्यासाठी हे महाशिबिर घेण्यात येत आहे. मागील वर्षी अशा प्रकारचे 450 शिबीरे घेण्यात आली होती. प्रत्येक शिबीरात 1 हजार याप्रमाणे 4.50 लाख लोकांना लाभ देण्यात आला. शासनाच्या 28 विभाग एकत्र आणुन त्यांच्या द्वारे त्यांच्या योजना जनतेच्या दारात पोहचविण्याची समन्वयाची जबाबदारी महसुल विभागाने पार पाडली. महिलांना त्यांच्या अधिकारानुसार त्यांच्या हक्काची नोंद याद्वारे घेण्यात येते. जोपर्यत जमीनीचे वाद सुटत नाही. तोपर्यत आपणास न्याय देता येणार नाही. अमरावती जिल्ह्यात उद्योग क्षेत्राने मोठी भरारी घेतली आहे. 500 हेक्टरवर 18 कंपन्यांपैकी 8 कंपन्या सुरु झाल्या आहेत. 30 हजार लोकांना रोजगार मिळणार असुन कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग ही आहेत. अमरावती येथील फ्रॉक देशभर प्रसिद्ध आहे. वरुड येथील संत्रा प्रक्रिया उद्योग, कोकाकोला कंपनी, कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात बदल करुन थेट विक्रीचा अधिकार शेतकऱ्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांची आडत्यांमधुन मुक्तता होत आहे.
या भागातील शेतमाल मुंबई व परदेशात विकता यावा, म्हणुन नागपुर-मुंबई एक्सप्रेस हाईवे हा मार्ग करण्याचा शासनाने निर्णय घेतला असुन या प्रकल्पासाठी लागणाऱ्या भूसंपादनासंदर्भात तसेच शेतकऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची उपयुक्तता जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधुन स्पष्ट केली. उपस्थित शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकुन घेतले.
यावेळी आमदार विरेंद्र जगताप, सभापती झाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय मुळे, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांची भाषणे झाली.
                                                                        00000

काचावार/कोल्हे/दि.06-08-2016/06.11 वाजता









Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती