Tuesday, August 9, 2016

जागतिक आदिवासी अस्मिता दिन उत्साहात साजरा
       अमरावती, दि.9 (जिमाका): आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस म्हणजे जागतिक आदिवासी अस्मिता दिन (दि.9 ऑगस्ट) आज संगीतसूर्य भोसले सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार विरेंद्र जगताप, उद्घाटक जि.प. अध्यक्ष सतीश उईके, प्रमुख अतिथी महापौर चरणजीत कौर नंदा, आमदार डॉ. अनिल बोंडे,  जिल्हाधिकारी किरण गित्ते, विट्ठलराव मरापे, हिम्मतराव उईके, विट्ठलराव तुमराव, नगरसेवक राजु मसराम, राजू युनाते, महानंदा टेकाम, माजी महापौर वंदना कंगाले, सह आयुक्त अनुसूचित जात पडताळणी विनोद पाटील, अजाबराव ऊईके, विविध आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना आमदार डॉ. बोंडे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांनी जागतिक स्पर्धेत उतरावे. निसर्ग ज्ञानाबरोबर वैज्ञानिक ज्ञान मिळवावे व आदिवासी विद्यार्थ्यांनी स्वत:तील उपजत अंगभूत शारीरिक सामर्थ्यांचा क्रीडा क्षेत्रात विकास केल्यास ऑलींपिक स्पर्धेपर्यत आदिवासी विद्यार्थी जाऊ शकतात, असा आशावाद व्यक्त केला. राज्यातील 25 हजार आदिवासी मुला-मुलींना नामांकित शाळेत प्रवेश देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.             शैक्षणिक सुविधा सुधारल्या पाहिजेत व आदिवासीसाठी असलेल्या शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचल्या पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने आदिवासी विकास झाला असे म्हणता येईल. असे उद्गार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी काढले. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अमरावतीत दोन मोठे वसतीगृह बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात 2 हजार कुटुंबांना वनाधिकार व 67 गावांना सामुदायिक वन हक्क देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
            महापौर चरणजीत कौर नंदा यांचे ही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना आमदार विरेंद्र जगताप म्हणाले कि, राज्य अर्थसंकल्पाच्या एकुण 9 टक्के निधी हा आदिवासी विकास विभागासाठी राखीव ठेवण्यात येतो. निधी वेळेत खर्च होण्यासाठी व त्याचा सदुपयोग होण्यासाठी आदिवासी संघटनांनी जागरुक असले पाहिजे. भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी कल्याणासाठी लढले. आदिवासी समाजाने ‘शिका, संघर्ष करा, संघटीत व्हा’ या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्रिसुत्रीचा अवलंब केला पाहिजे. यावेळी प्रिती गणेश भुसुम या आदिवासी विद्यार्थीनीने इंग्रजीतुन मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर आयुक्त गिरीश सरोदे, संचालन सुषमा कोठीकर यांनी केले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा व आदिवासी समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला.
                                                                        00000

वाघ/कोल्हे/सागर/दि.09-08-2016/4.40 वाजता



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...