जिल्ह्यातील पुलांच्या स्थितीचा घेतला पालकमंत्र्यांनी आढावा
       अमरावती, दि.6 (जिमाका): महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमि वर पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आज जिल्ह्यातील सर्व पुलांच्या स्थितीचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते उपस्थित होते.
            यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष जाधव यांच्यासह जलसंपदा, जलसंधारण विभागाचे अभियंता उपस्थित होते. जिल्ह्यातील एकुण 744 पुल असुन त्यापैकी 27 पुल हे ब्रिटीश कालीन आहेत. त्यातील हरिसाल-आकोट रस्त्यावरील पुल नादुरुस्त असुन त्याची दुरुस्ती लवकरच करण्यात येणार आहे. भातकुली तालुक्यातील सावरखेड जवळील 1979 मध्ये बांधलेला पुल कम बंधाऱ्यांची पाहणी करुन त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी जिल्ह्यातील नादुरुस्त असलेले, पुल संरक्षक कठडे नसलेले, कमकुवत असलेल्या पुलांचे तपासणी करण्याची सुचना देखील पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडीटची माहिती यावेळी जाधव यांनी दिली.
                                                                        00000
वाघ/कोल्हे/दि.06-08-2016/07.46 वाजता
वृत्त क्र.827                                                                    दिनांक 06-08-2016
जलयुक्त शिवार योजनेत पाणी जिरवण्याकडे भर द्या- पालकमंत्री
       अमरावती, दि.6 (जिमाका): जलयुक्त शिवार ही राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना असुन जलयुक्त शिवार मध्ये पावसाळ्यात जमीनीवर पडणारे पाणी भूगर्भात जिरवण्याकडे भर देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आज दिले.
            विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जलयुक्त शिवार आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी किरण गित्ते उपस्थित होते. 253 गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असुन सर्वाधिक 28 गावे दर्यापुर तालुक्यात आहेत. तर धामणगांव मध्ये 3 गावांचा समावेश आहे. यावेळी 2016-17 मध्ये प्रस्तावीत कामांचे संगणकीय सादरीकरण जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. यावेळी जलतज्ज्ञ नळकांडे यांनी देखील आपले विचार मांडले. यावेळी उपविभागीय अधिकारी ललीत कुमार वऱ्हाडे यांनी मोर्शी तालुक्यातील कामाचे सादरीकरण केले. भूजल पातळी वाढविणारा जिल्हा म्हणुन अमरावतीचा लौकीक झाला पाहिजे, असा आशावाद पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. मागेल त्याला शेततळे योजनेचा आढावा जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी दिला. यामध्ये जिल्ह्यात 3 हजार 159 शेततळ्यांचे उद्दिष्ट असुन ऑनलाईन अर्ज 3446 प्राप्त झाले आहे. 2022 शेततळ्यांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 1111 कामांचे कार्यालयीन आदेश निर्गमित झाले आहे. नांदगांव व दर्यापुर तालुक्यातुन मागेल त्याला शेततळे योजनेला उत्तम प्रतिसाद आहे. शेततळ्यांसाठीचे अनुदान वाढवुन देण्याचे शेतकऱ्यांची मागणी असल्याचे कृषि अधिक्षकांनी सांगितले.
                                                                        00000

वाघ/कोल्हे/दि.06-08-2016/07.46 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती