07- अमरावती लोकसभा मतदार संघ-अंतिम टक्केवारी 63.67


 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक; मतदारसंघात सर्वत्र उत्साहात मतदान

07- अमरावती लोकसभा मतदार संघ-अंतिम टक्केवारी 63.67
दिव्यांग मतदारांनी सुविधांचा लाभ घेत केले मतदान, सर्वत्र शांतततेत मतदान
मतदानाची टक्केवारी वाढवून शासकीय जनजागृतीला नागरिकांनी दिला उत्तम प्रतिसाद

अमरावती, दि. 27 (जिमाका): 07- अमरावती लोकसभा मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाने सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती. त्यानुसार सकाळी सात वाजतापासूनच मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात झाले. मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवून शासकीय जनजागृतीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अमरावती लोकसभा मतदारसंघात अंतिम आकडेवारीनुसार सरासरी 63.67 टक्के मतदानाची नोंद झाली.
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
मतदानाची विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम टक्केवारी याप्रमाणे : बडनेरा मतदार संघात 55.78, अमरावती मतदार संघात 57.51, तिवसा मतदार संघात 64.14, दर्यापूर मतदार संघात 66.88, मेळघाट मतदार संघात 71.55, अचलपूर मतदार संघात 68.84 टक्के असे एकुण अमरावती लोकसभा मतदार संघात 63.67 टक्के मतदान झाले.
लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणूकीत मतदान करताना अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. मतदारसंघात उत्सवात मतदारराजाने सक्रीय सहभाग घेत मतदान केले. मतदानाला ग्रामीण भागात भरभरुन प्रतिसाद मिळाला, तर शहरी भागातही मतदारांनी घराबाहेर पडून मतदानासाठी रांगा लावल्या. मतदारराजाने मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदान जास्त प्रमाणात करुन प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली. दिलेल्या या प्रतिसादामुळे जिल्ह्यात उत्साहात मतदान पार पडले. सर्वत्र शांततेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली.
विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडेय यांच्यासह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कॅम्प परिसरातील सेंट थॉमस शाळेत सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा प्रशासनाने यावेळी दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे दिव्यांग मतदारांनी सुविधांचा लाभ घेत उत्साहात मतदान केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक महिला मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र व यंग एम्प्लॉयीज मतदान केंद्र याप्रमाणे प्रत्येकी 6 महिला, दिव्यांग व एम्प्लॉयीज मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. तसेच बडनेरा मतदार संघातील मनपा उर्दु प्राथमिक मुलांची शाळा, जूनी वस्ती बडनेरा येथे रेन्बो मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. मतदान केंद्रावर दिव्यांगांकरिता सक्षम ॲपच्या माध्यमातून व्हीलचेअर आणि मतदान केंद्रावर नेण्या-आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
अमरावती विधानसभा मतदारसंघातील सेंट थॉमस, जि.प. उर्दु हायस्कुल, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, विदर्भ ज्ञान-विज्ञान महाविद्यालय तसेच राजापेठ परिसरातील भारतीय महाविद्यालय, समर्थ हायस्कुल याठिकाणी सकाळी सात वाजतापासूनच मतदानासाठी लांब रांगा दिसून आल्या. राजापेठ परिसरातील भारतीय महाविद्यालयाच्या सखी मतदान केंद्रावर महिलांची विशेष उपस्थिती दिसून आली. तसेच दिव्यांग व वयोवृध्द व्यक्तींसाठी स्थापित करण्यात आलेल्या कॅम्प क्षेत्रातील जिल्हा परिषद माजी कन्या शाळेतील मतदान केंद्रावर दिव्यांग व जेष्ठ नागरिकांची गर्दी दिसून आली. गाडगेनगर परिसरातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रावरही मतदारांची गर्दी दिसून आली. सर्व मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदान यादी, पिण्याचे पाणी, दिव्यांग व जेष्ठ व्यक्तींसाठी व्हीलचेअर, सावलीचा मंडप, बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह आदी व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती