लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी
- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अमरावती, दि.25 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी
दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना हक्क बजावता यावा यासाठी
राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी
सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. अमरावती
लोकसभा मतदारसंघातील सर्व कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी
द्यावी, असे आदेश जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निर्गमित
केले आहे.
उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या
5 एप्रिल रोजीच्या शासन निर्णयानुसार निवडणुक होणाऱ्या मतदान क्षेत्रात ही सुट्टी उद्योग,
ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांना लागू राहील.
खासगी कंपन्या, सर्व दुकाने, निवासी हॉटेल्स, उपाहारगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, रिटेलर्स,
माहिती तंत्रज्ञान कंपन्या, व्यापार, औद्योगिक उपक्रम आदींचा त्यात समावेश आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना
सुट्टीऐवजी कमीत कमी दोन ते तीन तासाची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी आस्थापना किंवा
कारखाना मालकाने जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्त यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक
राहील. मतदानासाठी सुट्टी किंवा पूर्वपरवानगीने सवलत न दिल्यास आस्थापना धारकाविरूद्ध
कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
00000
Comments
Post a Comment