Tuesday, April 16, 2024

परतवाडा येथील सुरक्षा कक्ष व प्रशिक्षण केंद्राला जिल्हाधिकारी यांनी दिली भेट; निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 









परतवाडा येथील सुरक्षा कक्ष व प्रशिक्षण केंद्राला जिल्हाधिकारी यांनी दिली भेट;

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

         अमरावती, दि. 16 (जिमाका):  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने परतवाडा विधानसभा संघातील मतदान केंद्र, सुरक्षा कक्षाला जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच परतवाडा येथे आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण केंद्राला उपस्थित राहून तेथे त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मतदान प्रक्रियेसाठी कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या नियम व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन सूनिश्चित कार्यपद्धती अवलंबावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी दिले.

 

           परतवाडा विधानसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्र व प्रशिक्षण कार्यशाळेला  जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, धारणीचे उपविभागीय अधिकारी रिचर्ड यान्थन, अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, चांदुर बाजारच्या तहसीलदार गीतांजली गरड आदी उपस्थित होते.

 

          लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने  आज परतवाडा येथे मतदान केंद्राध्यक्ष व इतर कर्मचाऱ्यांना दुसरे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशिक्षण स्थळाला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून मतदानाच्या दिवशी इव्हीएम मशीन हाताळणी, त्याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजना व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यानी यावेळी दिल्या.

 

            मौजा भुगाव, फातीमा कॉन्व्हेट फातिमा नगर, अचलपूर येथील मतदान केंद्राला श्री. कटियार यांनी भेट देऊन मतदारासाठी असलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. मतदान केंद्रावर आवश्यक त्या सोईसुविधा पुरविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. तसेच कल्याण मंडपम रोड, परतवाडा येथील सुरक्षा कक्ष व व्हीव्हीटी कक्षाची पाहणी करुन सुरक्षासंदर्भात आवश्यक त्या पूर्वतयारी करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

000000

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...