नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा

 



नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा;

निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा

 

          अमरावती, दि.24 (जिमाका) :  निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने सर्वांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपसी समन्वयाने व चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.

 

             लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणुक कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी आज घेतला. अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी शिवाजी शिंदे, सूचना प्रसारण अधिकारी मनिष फुलझले, अन्न धान्य वितरण अधिकारी श्री. राऊत, माध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, सहायक माहिती अधिकारी सतिश बगमारे तसेच ऑनलाईनव्दारे सर्व सहायक निवडणुक अधिकारी,  तहसिलदार आदी यावेळी उपस्थित होते.

 

              भारत निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणे मतदानपूर्व  48 तास व 24 तासात करावयाच्या कार्यवाहीबाबत निवडणूक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. निवडणूक प्रचार संपल्यावर राजकीय प्रचाराचे बॅनर काढणे, वाहनाची परवानगी व इतर आवश्यक बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सांगितले. मतदानाच्या दिवशी निवडणुक संदर्भातील अहवाल तातडीने व अचूक पाठवावा.  महिला, दिव्यांग व युवा मतदान केंद्रासह सर्वच मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मतदान अधिकारी व निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या राहण्याची, जेवणाची तसेच निवडणूक कामकाज भत्ता वेळेवेर द्यावा. मतदान कालावधीत सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधिताना दिल्या.

 

मुद्रीत माध्यमावरील जाहिराती पूर्व  प्रमाणिकरण करणे आवश्यक

 

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अमरावती लोकसभा मतदार संघासाठी माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक विषयक मुद्रीत माध्यमाव्दारे प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणिकरण करणे आवश्यक असल्याने ते प्रमाणित करुन घ्यावे, असे आवाहन श्री. कटियार यांनी यावेळी केले.

000000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती