लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; सुरक्षा कक्ष व प्रशिक्षण केंद्राला दिली भेट:मतदान प्रक्रिया पारदर्शक व यशस्वीपणे पार पाडा- सौरभ कटियार

 

















लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी;

सुरक्षा कक्ष व प्रशिक्षण केंद्राला दिली भेट:मतदान प्रक्रिया पारदर्शक व यशस्वीपणे पार पाडा- सौरभ कटियार

            अमरावती, दि. 15 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने अमरावती लोकसभा संघातील मतदान केंद्रावरील सोईसुविधांची पाहणी आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली. तसेच चांदुर रेल्वे येथील सुरक्षा कक्षाला भेट देऊन तपासणीही केली. चांदुर रेल्वे येथे आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण केंद्राला उपस्थित राहून तेथे त्यांनी मार्गदर्शन केले. मतदाना प्रक्रियेसाठी कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी दिले.

 

            अमरावती लोकसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्राला जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी भेटी देऊन तेथील उपलब्ध सोयी सुविधा तसेच व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिल भटकर,  अक्षय निलंगे, तेजश्री कोरे, मनपा उपायुक्त शामसुंदर देव, अमरावतीचे तहसिलदार विजय लोखंडे, नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी,  चांदुर रेल्वेच्या तहसीलदार पूजा माटोदे, धामणगाव रेल्वेचे तहसीलदार गोविंद वाकडे, सुनिल पाटील नायब तहसीलदार हेमंत पाटील आदी उपस्थित होते.

 

         लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने  आज चांदुर रेल्वे येथील बापुसाहेब देशमुख विद्यालय येथे मतदान केंद्राध्यक्ष व इतर कर्मचाऱ्यांना दुसरे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशिक्षण स्थळाला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.

 

            अमरावती व बडनेरा विधानसभा संघातील मतदान केंद्राला श्री. कटियार यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच मतदारांना वाटप झालेल्या वोटर स्लिपबाबत तपासणी केली. मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेसाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी तसेच मतदारांची मतदान केंद्रावर गैरसोय होऊ नये, यासाठी मतदान केंद्रावर आवश्यक त्या सोईसुविधा पुरविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिल्या. राहटगाव येथील महानगरपालिकाअंतर्गत असलेल्या पूर्व प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राला भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी केली. तसेच धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांदुर रेल्वे येथील सुरक्षा कक्ष व व्हीव्हीटी कक्षाची पाहणी केली.

 

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त रोहणखेडा मतदान केंद्राची केली पाहणी

 

          जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या रोहणखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली. या मतदान केंद्राची तातडीने दुरुस्ती कामे करुन आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या.  यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपस्थित होते.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती