स्वीपअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी तिरंगा महारॅली; स्वयंस्फुर्तीने मतदान जनजागृती अभियानात सहभागी व्हा-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 










स्वीपअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी तिरंगा महारॅली;

स्वयंस्फुर्तीने मतदान जनजागृती अभियानात सहभागी व्हा-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

            अमरावती, दि. 18 (जिमाका):  लोकसभा निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी याकरीता स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या, शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी दुपारी 4.30 वाजता नेहरु मैदान, अमरावती येथून मतदान जनजागृती तिरंगा महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या महारॅलीमध्ये जास्तीत-जास्त शासकीय निम शासकीय अधिकारी कर्मचारी, शिक्षक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने मतदान जनजागृती अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी केले आहे.

 

           लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  नियोजन भवन येथे मनपा व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके, मनपा शिक्षणाधिकारी डॉ. निलेश मेश्राम, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, बुद्धभूषण सोनवणे, जिल्हा परिषद व मनपाचे शिक्षक आदी यावेळी उपस्थित होते.

 

              लोकसभा निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी या महारॅलीचे आयोजन करण्यात आले असून ही रॅली नेहरू मैदान ते राजकमल चौकमार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक यामार्गाने मार्गस्थ होणार आहे. या महारॅलीमध्ये शासकीय निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, शाळा महाविद्यालयीन व्यवस्थापन, विद्यापीठ, जिल्हा परिषद, महानगर पालिका, पोलीस विभागातील कर्मचारी, 75 स्वयंसेवी संस्था, युवा मतदार सहभागी होणार असून त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. लोकशाही समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी 100 टक्के करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त देविदास पवार यांनी यावेळी केले.

 

                 महारॅली अभूतपूर्व व्हावी यासाठी नियोजन करण्यात आले असून रॅलीच्या मार्गावर सेल्फी पॉईंट, रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या संस्था, विद्यार्थ्यांव्दारे बॅनर, फलकावर मतदान जनजागृतीपर संदेश व घोषणा देण्यात येतील. तसेच पथनाट्याचेही यावेळी सादरीकरण केले जाणार आहे. रॅलीची सुरुवात नेहरू मैदान येथून दुपारी 4 वाजता होईल. तत्पूर्वी नेहरु मैदान येथे ‘मी मतदान करणार’ अशी शपथ घेऊन रॅली मार्गस्थ केली जाईल. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुहिक वाचन करुन महारॅलीचे समारोप होईल, अशी़ माहिती स्वीप नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी दिली.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती