मतदार जागृती व आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी
राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया

          अमरावती, दि.21 (जिमाका) : अमरावती विभागातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका शांततेत, सुरक्षितपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहिम हाती घ्यावी असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी दिले.
          येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन मधील सभागृहात राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील नगरपरिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकासंदर्भातील विभागीय आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, पोलिस महासंचालक सतिश माथूर, विशेष पोलिस महानिरिक्षक विठ्ठलराव जाधव, जिल्हाधिकारी किरण गित्ते, यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
          सहारिया म्हणाले की, राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील एकूण 192 नगर परिषदा व 20 नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार चार टप्प्यात या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबर,2016 रोजी मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात पुणे आणि लातूर या दोन जिल्ह्यांतील 14 नगरपरिषदांसाठी 14 डिसेंबर,2016 रोजी मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात औरंगाबाद, नांदेड, भंडारा आणि गडचिरोली या चार जिल्ह्यातील 20 नगर परिषदा व 2 नगरपंचायतींसाठी 18 डिसेंबर,2016 रोजी मतदान होत आहे. तर शेवटच्या टप्प्यात नागपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांसाठी 8 जानेवारी,2017 रोजी मतदान होत असल्याचे सांगितले.
          यावेळी अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांनी त्यांच्या जिल्ह्यात निवडणुकासंदर्भात करण्यात आलेल्या पूर्वतयारी व व्यवस्थेची माहिती सांगितली. निवडणुका शांततेत, सुरक्षितपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा सुचना यावेळी केल्या. निवडणुकांच्या संदर्भात कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. मतदार जागृती करताना मतदानाचे प्रमाण वाढविण्याबरोबरच वस्तु अथवा पैशाच्या स्वरुपातील प्रलोभनाला आळा घालणे, अवैध दारु वाटपावर नजर ठेवणे, तसेच बहुसदस्यीय पध्दतीनुसार आवश्यक तेवढी मते देणे याबाबत देखील मतदार जागृती करण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या.
          पोलिस महासंचालक सतिश माथुर म्हणाले की, निवडणुक ही महत्वाची घटनात्मक  प्रक्रिया आहे. निवडणुका शांततेत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे. आपापल्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था कायम राहिल याची काळजी घ्या. केंद्र शासनाने 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रद्द झालेल्या या नोटा बँकांत जमा करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत असल्यामुळे अजूनही या नोटांचे मुल्य आहे.  या जुन्या नोटांचे वाटप होणार नाही यासाठी सर्वांनी दक्ष रहावे अशा सुचना केल्या.
          प्रारंभी विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांनी अमरावती विभागातील निवडणुकांच्या संदर्भात करण्यात आलेल्या जिल्हानिहाय तयारीची माहिती दिली.    बैठकीचे सुत्र संचालन उप जिल्हाधिकारी प्रविण ठाकरे यांनी केले. उप जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उप जिल्हा निवडणुक अधिकारी गजेंद्र बावणे, निवासी उप जिल्हाधिकारी मोहन पातूरकर आदी उपस्थित होते.
                                                00000

काचावार/सागर/नितीन/दि.21-11-2016/17-30 वा.







Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती