वॉटर कप स्पर्धेमुळे धारणीची समृध्दीकडे वाटचाल सुरु होईल
                                                - जिल्हाधिकारी
* स्पर्धेत सहभागी होणारा पहिला आदिवासी तालुका
* 109 गावांचा सहभाग
 
* म.ग्रा.रो.ह यो
  मध्ये काम करण्यास सवलत.
          अमरावती, दि 28 : निसर्गाने समृद्धीच दान मेळघाटला दिल आहे. इथे पावसाळ्यात 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. पण उन्हाळ्यात इथे वन्यजीवांसोबतच माणसांनाही पाण्यासाठी भटकावे लागते. कारण याभागात पडणारे पावासाचे पाणी वाहून जाते. वॉटर कप स्पर्धेमुळे पावसाचे पाणी अडवून साचलेल्या पाण्यातून धारणी तालुक्याची समृद्धीकडे वाटचाल सुरु होईल. यासाठी प्रत्येक गावाने सत्यमेव जयते वॉटर कप  स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले.
          पाणी फाउंडेशन च्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धा-2 मध्ये यावर्षी धारणी तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. धारणी हा महाराष्ट्रातील या स्पर्धेत सहभागी होणारा एकमेव आदिवासी तालुका आहे. त्यासाठी आज धारणी येथे आयोजित पहिल्या  कार्यशाळेत  मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. या कार्यशाळेला पाणी फाउंडेशनचे प्रकल्प प्रमुख डॉ अविनाश पोळ, उपविभागीय अधिकारी  शनमुख राजन, तहसीलदार ए.जी.देवकर, गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख उपस्थित होते.
          वॉटर कप  ही शासनाची योजना नाही. यासाठी शासनाचा कोणताही  आदेश  नाही, निधी नाही,  तरीही मागील वर्षी 116 गावांनी यामध्ये सहभाग घेतला आणी आपले गाव श्रमदानाने जलसमृद्ध केले. मागील वर्षी जिल्ह्यातील वरुड तालुक्याचा समावेश केला होता. यातील वाठोडा गावाने 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळवले. यावर्षी धारणी तालूक्याचा समावेश आपण केला आहे. तालुक्यातील 156 पैकी 109 गावे यामध्ये सहभागी होत आहेत. एवढया मोठ्या प्रमाणात गावांचा सहभाग असलेला हा एकमेव तालुका आहे असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
          आदिवासी अजूनही जल, जंगल, जमिनिशी नाळ जोडून आहेत. पण त्याचबरोबर त्यांची गरिबीशी जुळलेली नाळ दुर्दैवी आहे. म्हणूनच या स्पर्धेत सहभागी होताना या आदिवासिंचा रोजगार हिरावल्या जाऊ नये म्हणून केवळ या तालुक्यासाठी  महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून काम करण्यास सवलत देण्यात आली आहे. आता गावकऱ्यांनी 45  दिवस 8 तासांपेक्षा जास्तीचे दोन तास काम करून आपले गाव या स्पर्धेत प्रथम येण्यासाठी श्रमदान करावे. म्हणजे या तालुक्याला लागलेला कलंक मिटून संपन्न तालुका अशी नवी ओळख निर्माण होईल. धारणीतील कष्टकरी आदिवासी हे काम करून दाखवतील असा विश्वास श्री गित्ते यांनी  यावेळी  व्यक्त केला.
          डॉ.अविनाश पोळ  पाणी फाउंडेशनचा या स्पर्धेमागचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले, गाव पाणीदार करण्यासाठी गावकऱ्याना त्याचे  विज्ञान, तंत्रज्ञान शिकवण्याची गरज आहे. गावातली एक व्यक्ती प्रशिक्षित झाल्यास  ते ज्ञान संपूर्ण गावापर्यंत पोहचेल. एकही पैसा न देता गावे या स्पर्धेत सहभागी होतील का अशी शंका पहिल्या वर्षी होती. पण 116 गावांनी सहभागी होऊन गावाला पाणीदार करण्यासाठी गावकरी श्रमदान करायला तयार असल्याचे सिद्ध केले. मागील वर्षी ज्या गावाने पहिले बक्षीस मिळवले त्या गावात यावर्षी 4 कोटी रुपयांच्या बटाट्याचे उत्पादन घेतले असल्याची माहितीही त्यांनी दिली. धारणी या आदिवासी तालुक्याचा समावेश या स्पर्धेत होणे हे या भागाचे भविष्य बदलण्यासाठी मैलाचा दगड ठरेल असेही श्री पोळ  यावेळी म्हणाले.
          या कार्यशाळेत धारणीच्या अनेक दुर्गम गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शिवाय वनविभाग आणि पंचायत समितीचे कर्मचारीही सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी तेलंग तर आभार तहसीलदार देवकर यांनी मानले. 

00000





Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती