शेतीला पुर्ण वेळ वीज देण्यासाठी रोहित्र सौर उर्जेवर आणणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
* जैन फार्मफ्रेश हिन्दुस्तान कोको कोला संत्रा उन्नती प्रकल्पाचे
ग्राम ठूणी येथे भूमिपूजन
* पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया प्रकल्पाची खरी सुरुवात
* कृषि प्रक्रिया उद्योगामुळे बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात
 प्रकल्पाचा 50 हजार शेतकऱ्यांना लाभ   

            अमरावती, दि.29 (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी वीज आणि पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे महत्वाचे बाबी आहेत. राज्य शासनाने या दोन्ही बाबींच्या पुर्ततेसाठी प्राधान्य दिले आहे. राज्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्ण करण्याबरोबरच शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडित वीज उपलब्ध करुन देण्याचे कार्य शासन करीत आहे. सौरउर्जेवर आधारीत कृषी पंप दिल्यानंतर आता शासन सौर उर्जेवर आधारीत रोहित्रेच आणत आहे. या संदर्भातील पायलट प्रकल्प सुरु झाला असून तो यशस्वी होत आहे. यामधून पुरेपूर वीज मिळणार असल्यामुळे शेतकरी समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

            मोर्शी तालुक्यातील ग्राम ठुनी येथे जैन फार्मफ्रेश हिन्दूस्तान कोकाकोला कंपनीच्या संत्रा उन्नती प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्याहस्ते आज करण्यात आले. त्यांनतर जवळच असलेल्या हिवरखेड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरिष महाजन, पालकमंत्री प्रविण पोटे पाटील, गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, आमदार सर्वश्री डॉ.अनिल बोंडे, रमेश बुंदिले, आशिष देशमुख, जैन इरिगेशन कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन, कोकोकोला कंपनीचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंदर कॅन्थ, जैन इरिगेशनचे विपणन प्रमुख अभय जैन, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलिस अधिक्षक लखमी गौतम, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल कुळकर्णी, मोर्शीच्या नगराध्यक्षा श्रीमती शिलाताई रोडे, सरंपच श्रीमती अमृते, जैन कंपनीचे कार्यकारी संचालक सुनिल देशपांडे आदी उपस्थित होते.
            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या संत्रा प्रकल्पाचा सामंजस्य करार झालेला असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई येथील मेक इन इंडिया विक या कार्यक्रमात राज्यातील महत्वाकांक्षी तीन प्रकल्पाचे सामंजस्‍य करार करण्यात आले होते. त्यापैकी मोर्शीतील संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचे प्रत्यक्ष भूमिपूजन करुन आम्ही वचनपुर्ती केली आहे. जैन इरिगेशनने देशात शेती क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. जगात 100 पेक्षा अधिक देशात अनिल जैन यांचे शेती क्षेत्रातील कार्य उल्लेखनिय आहे.  कृषि प्रक्रिया उद्योग  नसल्यामुळे बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात नाही, परिणामी नैसर्गिक आपत्ती आणि विपणन होत असलेल्या देशांमधील स्थानिक कारणांमुळे शेतमालाचे भाव पडतात. शासनाने कृषि प्रक्रिया उद्योग वाढवण्यावर भर दिला आहे. कृषि प्रक्रिया उद्योगांच्या निर्मितीमुळे बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात आहे, याचा आर्थिक  लाभ शेतकऱ्यांनाचा मिळणार आहे.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले, अमरावतीच्या नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत कापसापासून कापडापर्यंतचे मुल्यवर्धित 12 प्रक्रिया उद्योग सुरु केल्यामुळे 15 ते 20 हजार लोकांना रोजगार उपलब्ध  झाला  आहे. ॲपरण पार्कमुळे महिलांना रोजगार मिळणार आहे. संत्रा प्रक्रिया उद्योगामुळे कोकाकोला व जैन फार्मफ्रेश कंपनी संत्रा प्रक्रिया उत्पादनात ब्राझिल व अमेरिकेतून आयात करावा लागणारा गर आता आपल्या  मोर्शीत निर्माण  होणार आहे. त्यामुळे मोर्शीच्या संत्र्यांचा गर जगभरात या कंपनीच्या माध्यमातून पोहचणार आहे. या उत्पादनाला  100 टक्के देशी स्वरुप प्राप्त  होईल. या उत्पादनाची विक्री कोकाकोला जगभरात करेल. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळणार असुन ती दलालांच्या हातात न राहता शेतकऱ्यांच्या हातात राहणार आहे.
            हा  प्रकल्प पुढील दिड ते दोन वर्षात पुर्ण करण्याचे अनिल  जैन यांनी वचन दिले आहे. संत्र्यांचे नवीन वान विकसित केल्यामुळे  एकरी आठ ते दहा टन उत्पादन मिळणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना 50 हजार अधिक  उत्पादन या वानामुळे मिळणार आहे. फक्त तीन वर्षात  या वानास फलधारणा  होणार आहे. विदर्भातील अनुशेष तीन वर्षात  पुर्ण करण्यासाठी अपुर्ण  सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. कृषि मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कृषि  क्षेत्रात अमुलाग्र क्रांती करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
            यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते अशोक रोडे, हरीभाऊ सुखसोडे, नवीन पेठे आदी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार केला.
 कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यावेळी म्हणाले, शेतमालावर  प्रक्रिया  करणारी खारखानदारी झाली  पाहिजे. या संत्रा  प्रक्रिया उद्योगामुळे 50 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. प्रकल्प पुर्ण होताच या भागातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात कायापालट होणार आहे. मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथील बंद अवस्थेत  असलेला संत्रा  प्रक्रिया प्रकल्प महाऑरेंज या संस्थेला  पुढील पाच वर्षासाठी देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शासन जमीनीची आरोग्य तपासणीसाठी पाच गावांमागे एक प्रयोग शाळा सुरु करणार आहे.
            जलसंपदा मंत्री गिरिष महाजन म्हणाले, जैनचे कृषि क्षेत्रातील  संशोधन कार्य मोठे  आहे. उपलब्ध  पाणी साठ्यातून संपन्न शेती करण्याचे कसब जैन इरिगेशनने शेतकऱ्यांना मिळवून दिले  आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुषेश दुर करण्यासाठी अपुर्ण सिंचन प्रकल्पांना पुढील तीन वर्षात पुर्ण करण्यात येईल.            
            अनिल जैन यांनी प्रकल्पा मागची भूमिका  स्पष्ट करीत शेतकऱ्यांना  होणारे लाभ समजून सांगितले.
            संचालन जैन इरिगेशनचे जनसंपर्क अधिकारी विनोद रापतवार यांनी केले. कार्यक्रमाला  लोकप्रतिनिधी, कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जैन इरिगेशन कंपनीचे अधिकारी व कर्मचारी व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव उपस्थित  होते.
00000

काचावार/तायडे/गावंडे/पाटील/सागर/गावंडे/दि.29-12-2016/17-00 वाजता









Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती