आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांची
हरिसाल, सेमाडोह, धारणी, बैरागड, बिजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट
मेळघाटातील कुपोषण व बालमृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी दिले निर्देश
* अमृत आहार योजनेचा सर्वांपर्यंत लाभ पोहचवा
          अमरावती, दि.10 (जिमाका): आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मेळघाटातील हरिसाल, सेमाडोह, धारणी, बैरागड, बिजुधावाडी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रांना भेटी देवून आदिवासी बांधवांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. बालमृत्यू व कुपोषण कमी करण्यासाठी शासनाच्या अमृत आहार योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश त्यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिले.
          यावेळी आ.प्रभुदास भिलावेकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.प्रदिप व्यास, आरोग्य संचालक सतिश पवार, आरोग्य सहसंचालक अर्चना पाटील, आरोग्य सहसंचालक डॉ.कांबळे, विशेष कार्यधिकारी नितीन बिलोलीकर, डॉ.एस.पी.पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव आदी उपस्थित होते.
          आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांनी सकाळी सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पहाणी केली व तेथील सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.
          त्यानंतर हरिसाल येथे ग्रामस्थांशी चर्चा केली तेथील अंगणवाडी केंद्रास भेट देवून बालकांना अमृत आहार योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या लापशी, उसळ, खिचडी, केळी, अंडी, दुध आदीची माहिती घेतली. श्रेणीनुसार या केंद्रात साधारण, मध्यम व तीव्र कुपोषित बालकांची वर्गवारीची माहिती घेतली. चंद्रकला मुकुंदराव या अंगणवाडी ताईंनी माहिती दिली.
डिजिटल व्हिलेज हरिसालला भेट
          राज्यातील पहिले डिजिटल व्हिलेज म्हणून शासनाकडून हरिसाल या गावाची निवड करण्यात आली आहे. त्यादृष्टीने हरिसाल व पंचक्रोशितील गावांना सर्व शासकीय योजनाद्वारे जोडण्यात येणार आहे. सर्व माहिती डिजिटल पद्धतीने संगणकीकृत करण्यात येणार आहे याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी घेतली. हरिसालचे सरपंच गणेश येवले यांनी ही माहिती दिली. हरिसाल येथे वायफाय सुविधा 100 मीटरच्या रेंजमध्ये सध्या उपलब्ध असुन सर्व ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता येते. शेतकऱ्यांना सातबारा तसेच अन्य उतारे देण्यात येतात. शासनाच्या या सुविधेमुळे हरिसालमधील 70 टक्के लोक स्मार्टफोन वापरता. हळूहळू बदल घडत आहे. मोबाईल बँकिग आणि कृषि ॲपचा शेतकरी फायदा घेवू लागले आहे. सकारात्मक बदल नजिकच्या काळात दिसून येत आहे.

          हरिसाल येथे एल.व्ही.प्रसाद व्हिजन सेंटरला भेट दिली. तसेच हरिसाल येथील टेलिमेडिसीन सेवेची माहिती घेतली. टेलिमेडिसीन सेवेद्वारे आतापर्यंत मेळघाटातील 27 दुर्धर आजारांच्या रुग्णांवर वैद्यकिय सेवा देण्यात आली. मेळघाटातील कनेक्टिव्हिटीची समस्या लक्षात घेता या टेलिमेडिसीनद्वारे दर मंगळवारी अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, बुधवारी डफरीन व शुक्रवारी इर्विन येथील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात येतो. रुग्णांना या कामासाठी अमरावतीला जाण्याची आवश्यकता नाही. तज्ज्ञांच्या निर्देशानुसार त्यांना अमरावती येथे भर्ती करण्यात येते. तसेच व्हिजन सेंटरमध्ये आतापर्यंत 299 नेत्र रुग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी 54 मोती बिंदूचे निदान करुन 36 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती हरिसालचे वैद्यकिय अधिकारी डॉ.एस.आय.थोरात यांनी आरोग्यमंत्र्यांना दिली. तसेच परिसरातील आश्रमशाळेतील 25 विद्यार्थ्यांना व 22 प्रौढांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी बालरोग शस्त्रक्रिया कक्ष, मुतखडा, रक्त तपासणी आदी कक्षांना भेटी देवून पाहणी केली.
बैरागड व येथे भुमकां शी चर्चा
       आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांनी बैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून आरोग्य सुविधांची पाहणी केली. वैद्यकिय अधिकारी कंकाळे यांनी सर्व सुविधांची माहिती दिली. आंतररुग्ण विभाग, प्रसुती पश्चात कक्ष, बाल उपचार केंद्र आदी पाहणी केली. मेळघाट भुमक्यांचा चांगला प्रभाव होता. त्यांच्याकडूनच आदिवासी बांधव आरोग्य सल्ले घेत होते. त्यातून अनेक वेळा रुग्ण दगावले आहेत. भुमक्यांच्या मार्फत आरोग्य सेवा सुधारण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. भुमकांना प्रत्येक रुगणामागे ठराविक मानधन देण्यात येते. त्यावर भुमकांची पुर्ण गुजरान होते. प्रत्येक आरोग्य केंद्र व आरोग्य उपचार केंद्रास भुमक्यांनी आणलेल्या रुग्णांची वेगळी नोंदवही ठेवा. लवकरच आपन भुमकांचा मेळावा घेणार आहो. त्यंच्या अडीअडचणी समजुन घेतल्या, त्यांचे दरमहा मानधन तातडीने अदा करावे अशा सुचना दिल्या.
          ग्राम बालविकास केंद्रातील (व्हिसीडीसी) चार्ट अद्यावत करावे. उपचार गृह ची स्वच्छता नियमित करावी. प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर कामाचे वाटप करावे. 108 क्रमांकांच्या गाड्यांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता संबंधितांना रुग्णांच्या नियमित तपासणीसाठी केलेल्या कृती आराखड्याची त्यांनी माहिती घेतली.
          शेवटी बिजुधावडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून सुविधांची पाहणी केली.  यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले शासनाकडून मेळघाटात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमार्फत निधी पुरविला जातो. यंत्रसामुग्री चांगली आहे. बिएएमएस च्या डॉक्टरांचे प्रश्न सोडविले आहे. नजिकच्या काळात अजुनकाही प्रश्न असतील तर तेही सोडवू परंतु मेळघाटातील आरोग्य सेवेला प्राधान्य देवून माता, बाल कुपोषण होणार नाही याची काळजी घ्यावी.
00000










Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती