Thursday, January 5, 2017

सर्व बँकात नवीन चलनाचा पुरेसा साठा उपलब्ध
विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता
* मर्यादे प्रमाणे जुन्या नोटा बदलुन नव्या मिळणार
* बँक खात्यात जुने चलन भरण्यासाठी मर्यादा नाही
* बँकांनी अतिरिक्त जादा काऊंटरची सुविधा द्यावी

          अमरावती, दि.9 (जिमाका): केंद्र शासनाने दि.8 नोव्हेंबर, 16 च्या मध्यरात्रीपासून देशात 500 व 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहिर केला. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात सर्व बँकांमध्ये 500 व 1000 रुपयाचे नवीन चलनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेनुसार जुन्या नोटा बदलुन मिळतील. तसेच आपल्या बँक खात्यातुन रकमा काढण्यासाठीही नवीन चलन उपलब्ध असेल. नागरिकांनी संयम बाळगून बँकांना तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांनी केले.

          येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली नवीन चलना संदर्भात आयोजित बैठकित मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, पोलिस उपायुक्त प्रदिप चव्हाण तसेच बँक, पेट्रोल पंप, रुग्णालय, रेल्वे, पोस्ट ऑफिस, गॅस वितरक आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

          विभागीय आयुक्त गुप्ता म्हणाले की, केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे सर्वांना आपआपल्या खात्यात जुन्या नोटा जमा करण्यास मर्यादा नाही. इतरांच्या खात्यात जमा करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक राहील. दि.30 डिसेंबर, 16 पर्यंत बँक व पोस्ट खात्यातुन जुन्या नोटा बदलुन मिळतील. या मर्यादेनंतर दि.31 मार्च, 2017 पर्यंत विलंबाचे कारण, पुरावे आणि शपथपत्र भरुन रिझर्व बँकेच्या कार्यालयात या नोटा जमा करता येतील. 500 व 1000 रुपयाच्या नोटा रेल्वे, विमानतळ, सरकारी बसस्थानक, खाजगी रुग्णालय, औषधांची दुकानात दि.11 व 12 नोव्हेंबर, 16 च्या मध्यरात्रीपर्यंत स्विकारण्यात येतील. संबंधितांनी नागरिकांची अडवणूक करु नये. सध्याची परिस्थिती लक्षात घेता बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेवून बँक प्रशासनाने आपआपल्या शाखेत जादा काऊंटर उघडावेत व जादा वेळ व्यवहार करुन ग्राहकांना सुविधा द्याव्यात. पेट्रोल पंप, रुग्णालय, बस स्थानक आदींकडून येणारी रक्कम स्विकारण्यासाठी त्यांना अग्रक्रम द्यावा अशा सुचना केल्या.




नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी

       यावेळी विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सुचना पोलिस प्रशासनास केल्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस नियंत्रण कक्षाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. अमरावती शहर 0721-2551000, 2550612, अमरावती ग्रामीण 0721-2665041, जिल्हाधिकारी कार्यालय 0721-2662025 हे क्रमांक देण्यात आले आहे. ज्या ज्या बँकांना पोलिस बंदोबस्तची आवश्यकता भासेल त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा. पेट्रोल पंप, हॉस्पिटल, दुध केंद्र आदी ठिकाणी अत्यावश्यक सेवा चालु राहतील. विद्युत विभागानेही विशेष करुन बँक कार्यालयाच्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. गरजेनुसार मोठ्या बँक शाखेत जादा पोलिस बंदोबस्त उपलब्ध करण्यात येणार आहे.
स्वतंत्र हिशोब ठेवा

       जिल्हाधिकारी किरण गित्ते बँक व्यवस्थापकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, सर्व बँकांनी जुन्या नोटा, खात्यातुन काढलेल्या रकमा, जमा होणाऱ्या रकमा याचा स्वतंत्र हिशोब ठेवावा म्हणजे जिल्ह्यात किती रकमेच्या जुन्या नोटा बदलुन वितरित करण्यात आलेले नवे चलन याबाबतची माहिती ठेवावी. तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवावा. गरजेनुसार होमगार्डची सेवा ही घ्यावी. पोलिस विभागातर्फे स्पेशल युनिटची सोय करण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेल्या परिसरात वाढिव बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
000000

काचावार/धोंगडे/गावंडे/सागर/दि.9-11-2016/18-30 वाजता




No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...